बेंग्कुलू - इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. इंडोनेशियाच्या आपत्कालीन यंत्रणेने सोमवारी (29 एप्रिल) 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली असून आणखी 13 जण बेपत्ता असल्याचं स्पष्ट केलं आहे. लामपुंग प्रांतात शनिवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन त्यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर जकार्ताच्या आजूबाजूच्या परिसरात आलेल्या पुरामुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता.
जवळपास दोन हजारांहून अधिक जणांना घरातून बाहेर पडावे लागले आहे. सुमात्राच्या बेंग्कुलू प्रांतात पाणी साचल्याने 12 हजार नागरिकांना बाहेर काढावे लागले. तसेच अनेक इमारती, पूल आणि रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले. बेकायदेशीर कोळसा खाणींमुळे भूस्खलन मोठय़ा प्रमाणावर झाल्याचा आरोपही केला जात आहे. तर मानवनिर्मित संकटांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन पूर आल्याचा आरोपही काही जणांनी केला आहे.
इंडोनेशियाच्या पापुआ भागात याआधी काही दिवसांपूर्वी अचानक आलेल्या महापुरामुळे 79 जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जयपुरा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. पूर आणि भूस्खलनामुळे 116 जण जखमी झाले असून त्यातील 41 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली होती. पूराचा अनेक जिल्ह्यांना फटका असल्यामुळे आपत्तीमधील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. कारण अनेक जण बेपत्ता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. या परिसरातील घरे, रस्ते, पूल आणि इतर ठिकाणांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले होते.
इंडोनेशियात निवडणूक कामाच्या ताणामुळे 272 कर्मचाऱ्यांचा मृत्यूइंडोनेशियामध्ये अलीकडेच राष्ट्राध्यक्ष, संसद, प्रांतिक विधिमंडळांचे सदस्य निवडण्यासाठी एकाच दिवशी मतदान होऊन मतमोजणीही लगेच घेण्यात आली होती. निवडणुकांतील या अतिकामाच्या ताणामुळे तेथील 272 निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला व 1878 जण आजारी पडले आहेत. पहिल्यांदाच सर्व निवडणुका एकत्र घेणे, त्याची मोजणी लगेच करणे, यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला. इंडोनेशियात मतदान ईव्हीएमद्वारे नाही तर मतपत्रिकांवर केले जाते. 26 कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये एकाच दिवशी सर्व निवडणुका घेण्याची ही पहिलीच वेळ होती. 17 एप्रिल रोजी पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये 19.3 कोटी मतदारांपैकी 80 टक्के लोकांनी मतदान केले. 8 लाख मतदान केंद्रांवर प्रत्येक मतदाराने सर्व निवडणुकांसाठी पाच स्वतंत्र मतपत्रिकांद्वारे आपला हक्क बजावला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ तासांच्या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. या अतिकामाचा ताण आल्याने शनिवारी रात्रीपर्यंत 272 निवडणूक कर्मचारी मरण पावले.