श्रीलंकेमध्ये अत्यावश्यक वस्तूंवरील दरनियंत्रण हटविल्याची सरकारने मोठी घोषणा केल्यानंतर नागरिकांचे आता प्रचंड हाल सुरू झाले आहेत. सोमवारी घरगुती सिलिंडरच्या दरात जवळपास 90 टक्क्यांची वाढ झाली आहे. 12.5 किलो गॅस सिलिंडरच्या किंमत गेल्या शुक्रवारी 1400 रुपये होती. तर आता यामध्ये 1257 रुपयांची वाढ झाली असून ही किंमत तब्बल 2657 रुपये झाली आहे. तर 250 रुपयांना मिळणारी एक किलो दूध पावडर आता 1195 रुपयांना मिळत आहे.
पीठ, साखर यासह जीवनावश्यक वस्तुंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. लोकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंका सरकारने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दरनियंत्रण हटविण्याचा हा निर्णय झाला होता.
पीठ, साखर आणि सिलिंडर गॅसवरील दरनियंत्रण हटविण्याचा निर्णय
ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, "पुरवठा अधिक प्रभावीपणे व्हावा यासाठी मंत्रिमंडळाने दूध पावडर, पीठ, साखर आणि सिलिंडर गॅसवरील दरनियंत्रण हटविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने किमती सुमारे 37 टक्क्यांनी वाढतील हाही अंदाज होता. मात्र नफेखोर मनमानी किमती वाढवतील असे वाटले नव्हते." सरकारने तातडीने दर नियंत्रणात आणावे, अशी मागणी होत आहे. कोरोना संकटामुळे देशाला आर्थिक संकटाचा देखील सामना करावा लागतो आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.