Iran-Israel :इराण आणि इस्रायल, यांच्यात सुरू असलेले युद्ध अधिक तीव्र झाले आहे. याचे कारण म्हणजे, इराणने 13 एप्रिलच्या मध्यरात्री इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे 300 पेक्षा जास्त हल्ले केले. या घटनेमुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. या हल्ल्याच्या एक दिवस आधी इराणने एक इस्रायली मालवाहू जहाज ताब्यात घेतले आहे. या जहाजावर एकूण 25 कर्मचारी असून, त्यापैकी 17 भारतीय आहेत. आता या हल्ल्यांमुळे त्या 17 भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न भारतासाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारे MSC Aries, हे इस्रायली जहाज ताब्यात घेतले आहे. हे जहाज लंडनस्थित झोडियाक मेरीटाईमचे आहे, जे इस्रायली अब्जाधीश आयल ऑफरच्या झोडियाक ग्रुपशी संबंधित आहे. हे जहाज संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील बंदरातून निघाले होते. इराण आणि इस्रायलमधील सध्याच्या परिस्थितीमुळे भारत सरकारसमोर आपल्या 17 नागरिकांना वाचवण्याचे मोठे आवाहन आहे.
भारताने अधिकृतपणे इराण आणि इस्रायल, यांच्यातील सध्याच्या परिस्थितीवर निवेदन जारी केले आहे. भारत सरकारचे म्हणणे आहे की, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे आम्ही चिंतेत आहोत. दरम्यान, भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि त्यांची लवकर सुटका करण्यासाठी भारत सरकार राजनयिक माध्यमांद्वारे इराण सरकारच्या संपर्कात आहे. या दोन देशांमधील संघर्ष वाढल्यास भारतासमोर निश्चितच आव्हान निर्माण होईल. भारताचे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी भारत परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे.