तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? सौदी अरेबियावर हल्ला करू शकतो इराण, अमेरिकेचे सैन्य हाय अलर्टवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 08:28 AM2022-11-02T08:28:57+5:302022-11-02T08:29:51+5:30
सौदी अरेबियातील अनेक ठिकाणी इराण हल्ले करू शकतो.
सौदी अरेबिया आणि इराण यांच्यात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे इराणसौदी अरेबियावर कधीही हल्ला करू शकतो, असे वृत्त आहे. सौदी अरेबियाने ही गुप्तचर माहिती अमेरिकेला दिली आहे. सौदी अरेबियातील अनेक ठिकाणी इराण हल्ले करू शकतो. ही गुप्तचर माहिती समोर येताच आखाती देशांमध्ये उपस्थित असलेल्या अमेरिकन लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. इराणने सौदी अरेबियावर हल्ला केल्यास जग पुन्हा एका महायुद्धाच्या (World War) तोंडावर येऊ शकते.
अमेरिका आणि सौदी अरेबिया हाय अलर्टवर आहेत, कारण सौदीच्या गुप्तचरांनी अमेरिकेला माहिती दिली आहे की, इराण सौदी अरेबियातील अनेक ठिकाणांवर हल्ला करण्याचा विचार करत आहे, असे वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच, दोन्ही देशांच्या अधिकार्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलसोबत येऊ घातलेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
सौदीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सौदी अरेबियाव्यतिरिक्त इराणला इराकच्या एरबिलवर हल्ला करायचा आहे, जिथे अमेरिकन सैन्य आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नियोजित हल्ल्यांचा हेतू इस्लामिक राष्ट्राच्या नेतृत्वाविरोधात इराणमधील निदर्शनांवरून लक्ष हटवण्याचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुप्तचर माहितीची पुष्टी करणार्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा हल्ला 48 तासांच्या आत होऊ शकतो.
अमेरिकेने काय म्हटले?
अमेरिकेला त्या भागातील धोक्याच्या परिस्थितीबद्दल चिंता आहे आणि सौदी अधिकार्यांशी सतत संपर्कात आहोत, असे पेंटागॉनचे प्रेस सचिव, वायुसेना ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, पॅट रायडर यांनी कोणत्याही विशिष्ट धोक्याबाबत सांगण्यास नकार देत सांगितले की, "आम्ही स्वतःचे रक्षण आणि बचाव करण्याचा आमचा अधिकार राखून ठेवू, मग आमचे सैन्य इराकमध्ये किंवा इतरत्र सेवा देत असेल."
याआधीही हल्ला
दरम्यान, इराण हा सौदी अरेबियाचा प्रमुख प्रादेशिक प्रतिस्पर्धी आहे. रियाधने 2016 मध्ये तेहरानशी अधिकृत राजनैतिक संबंध तोडले होते. त्यावेळी सौदी अरेबियातील एका शिया धर्मगुरूला फाशी दिल्याच्या प्रत्युत्तरात इराणी निदर्शकांनी तेहरानमधील सौदी दूतावासावर हल्ला केला होता. इराण-समर्थित हौथी बंडखोरांनी अलिकडच्या वर्षांत सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधील तेल सुविधांवरही हल्ला केला आहे, ज्यामुळे ऊर्जा पायाभूत सुविधा या क्षेत्रातील कोणत्याही इराणच्या चिथावणीचे लक्ष्य असू शकतात अशी चिंता व्यक्त केली आहे.