...तर खनिज तेलाचा व्यापार थांबवून जगात हाहाकार उडवू; इराणचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 07:39 PM2018-12-04T19:39:21+5:302018-12-04T19:41:06+5:30
अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांवरुन इराण आक्रमक
तेहरान: अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांविरोधात इराणनं आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेनं इराणकडून होणारी खनिज तेलाची निर्यात थांबवण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा पर्शियाच्या आखातातून सुरू असलेली तेल वाहतूक थांबवून जगात हाहाकार उडवू, असा इशारा इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी दिला आहे. इराणनं हे पाऊल उचलल्यास जगातील अनेक देश अडचणीत सापडू शकतात. कारण पर्शियाच्या आखातामधूनच मध्य पूर्व आशियातील देश जगभरात तेलाची वाहतूक करतात.
आखाती भागातील बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे देश जगभरात तेलाची निर्यात करतात. या देशांमधून निघणारी खनिज तेलाची जहाजं पर्शियाच्या आखातामधूनच जातात. इराणनं या भागातून होणारी तेलाची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा सर्वाधिक फटका सौदी अरेबियाला बसेल. कारण सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. सौदीकडून जगातील अनेक देशांना तेल पुरवठा होतो.
1980 ते 88 च्या दरम्यानदेखील पर्शियाचं आखात वादाच्या केंद्रस्थानी होतं. त्यावेळी सौदी अरेबिया आणि इराणनं एकमेकांच्या जहाजांवर हल्ले केले होते. 1980 नंतर इराणनं अनेकदा या भागातून होणारी तेल वाहतूक रोखण्याची धमकी दिली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव आल्यावर इराणनं अनेकदा धमकी अस्त्र उगारलं. मात्र ही धमकी अंमलात आणली नाही. 2015 मध्ये तेहरान अणू करारापासून वेगळं झाल्यानंतर अमेरिकेनं इराणवर निर्बंध लादले. या निर्बंधांतर्गत इराणला तेल निर्यात बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र यातून आठ देशांना वगळण्यात आलं आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे.