तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिकेने हवाई हल्ल्यामध्ये इराणच्या टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या केल्याने संतप्त झालेल्या इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी आठ कोटी डॉलरचे इनाम जाहीर केले आहे. दुसरीकडे अमेरिकन सैन्याने निघून जावे, असा ठराव इराक पार्लमेंटने केल्याने ट्रम्प संतापले आहेत.आम्ही इराकमधील बगदादचा हवाई तळ अजिबात सोडणार नाही. तो अत्यंत महागडा तळ आहे. तो सोडण्यास इराकने आम्हाला भाग पाडल्यास आम्ही इराकवर असे निर्बंध लादू की, त्या तुलनेत इराणवरील निर्बंध किरकोळ वाटतील, असे ट्रम्प म्हणाले.सुलेमानी यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या वेळी एका लाखाहून अधिक इराणी पुरुष व स्त्रिया उपस्थित होत्या. त्यावेळी प्रत्येक इराणी व्यक्तीने एक डॉलर दिल्यास त्यातून आठ कोटी डॉलर उभे राहतील व ती रक्कम ट्रम्प यांचा शिरच्छेद करण्यास इनाम म्हणून दिली जाईल, असे जाहीर करण्यात आले.अण्वस्त्र करारानुसार इंधनाच्या समृद्धीकरणाबाबतचे निर्बंध पाळण्यास आम्ही बांधील नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे. यामुळे अमेरिकेशी सुरू झालेला संघर्ष अधिक पेटेल, अशी भीती आहे. इराणने अण्वस्त्र विकसित करू नयेत, यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत हा करार केला गेला होता. सुरक्षा परिषदेमध्ये रशिया फ्रान्स, चीन, ब्रिटन, अमेरिका हे कायम सदस्य आहेत. अमेरिकेने या करारातून स्वत:च माघार घेतली आहे. (वृत्तसंस्था)>तीन देशांचे आवाहनअण्वस्त्र कराराचे कृपया उल्लंघन करू नका, अशी विनंती जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांनी इराणला केली आहे. तिन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्त निवेदनाद्वारे इराणने या कराराशी सुसंगत धोरणेच राबवावीत, असे म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी इराणचे इनाम, ८ कोटी डॉलरचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 6:37 AM