कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला असताना ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. इराकमध्येही ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट होऊन ८२ लोकांचा जीव गेला आहे. याठिकाणी कोविड रुग्णालयातील ऑक्सिजनचा स्फोट झाला आहे. तर या स्फोटात ११० पेक्षा जास्त रुग्ण गंभीररित्या जखमी झाले आहेत. इराकच्या परराष्ट्र खात्याने सांगितल्यानुसार, राजधानी बगदागदमध्ये इब्न अल खतीब कोविड रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला.
हा स्फोट इतका भयंकर होता की, कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ८२ रुग्णांचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबदार ठरला आहे. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा स्फोट झाला आणि त्याठिकाणी आग लागली. अल खतीब रुग्णालयातील कोविड वार्डात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. इराकच्या पंतप्रधानांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ जबाबदार अधिकाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ केले आहे.
कोविड रुग्णालयात ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा तिथे कोरोनानं गंभीर संक्रमित असलेले २८ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते ही माहिती इराकच्या मानवधिकार आयोगाचे प्रवक्ते अली बयाती यांनी दिली आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या स्फोटानंतर झालेली आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न करत होते. तर दुसरीकडे या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.