डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; इराकच्या कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

By कुणाल गवाणकर | Published: January 7, 2021 07:58 PM2021-01-07T19:58:34+5:302021-01-07T21:22:29+5:30

समर्थकांनी अमेरिकन संसदेवर हल्ला केल्यानं अडचणीत आलेल्या ट्रम्प यांचा पाय आणखी खोलात

iraq Issues Arrest Warrant For Donald Trump Over Qassim Suleimani Killing | डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; इराकच्या कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय खोलात; इराकच्या कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

Next

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या संसदेवर झालेल्या हल्ल्यामुळे अडचणीत आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेवर हल्ला केल्यानं अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यातच आता इराकमधील न्यायालयानं ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. इराणचे जनरल आणि एका प्रभावशाली इराकी मिलिशिया नेत्याला ठार मारल्याप्रकरणी अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. याआधी इराणनंदेखली ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. इराणनं ट्रम्प यांच्या अटकेसाठी इंटरपोलचीदेखील मदत मागितली आहे.

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी आणि अबु माहदी अल मुहंदिस मारले गेले. या प्रकरणात बगदादच्या न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी वॉरंट जारी केल्याची माहिती इराकी न्यायालयाच्या माध्यम कार्यालयानं दिली. सुलेमानी आणि मुहंदिस गेल्या वर्षी बगदाद विमानतळाबाहेर ड्रोन हल्ल्यात मारले गेले. त्यानंतर अमेरिका आणि इराकमधील संबंध ताणले गेले.

इराणनं त्यांच्या सर्वात वरिष्ठ जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येच्या एका वर्षानंतर आंतरराष्ट्रीय संस्था इंटरपोलकडे ट्रम्प यांच्या अटकेसाठी मदतीची मागणी केली आहे. ट्रम्प यांच्यासह अमेरिकच्या ४७ अधिकाऱ्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचं आवाहन इराणनं इंटरपोलकडे केलं आहे. इराणनं याआधी जूनमध्ये इंटरपोलकडे रेड कॉर्नरची नोटीस जारी करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र तेव्हा इंटरपोलनं त्यांची मागणी फेटाळली होती.

रेव्हॉल्युशनरी गार्डचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष आणि पेंटॉगॉनचे कमांडर यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी व्हायला हवी, अशी मागणी इराणचे न्याय विभागाचे प्रवक्ते गुलाम हुसेन इस्माइली यांनी केली. आम्ही यासाठी इंटरपोलकडे आवाहन केलं आहे. आमच्या कमांडरच्या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी आणि याबद्दल आम्ही अतिशय गंभीर आहोत, असं इस्माइली पुढे म्हणाले. इराणनं या प्रकरणात आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १ हजार पानांचं आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे.

Web Title: iraq Issues Arrest Warrant For Donald Trump Over Qassim Suleimani Killing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.