इलॉन मस्क अचानक इस्रायलमध्ये दाखल; पीएम नेतन्याहूंची भेट घेऊन दिला पाठिंबा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 09:20 PM2023-11-27T21:20:09+5:302023-11-27T21:20:38+5:30
Elon Musk On Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धादरम्यान टेस्ला आणि एक्सचे प्रमुख इलॉन मस्क इस्रायलमध्ये दाखल झाले.
Israel-Hamas War: मागील एका महिन्यापासून इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास, यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान एक्स आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) इस्रायलमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली आणि या संघर्षात इस्रायलला पाठिंबा दिला.
इलॉन मस्क यांनी इस्रायलचे समर्थन करताना म्हटले की, "इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध संपल्यानंतर गाझाच्या पुनर्बांधणीत मदत करू इच्छितो, परंतु पॅलेस्टिनी भागांना कट्टरतावादापासून मुक्त करणे महत्त्वाचे आहे."
סיירתי עם אילון מאסק בקיבוץ כפר עזה כדי להראות לו מקרוב את הפשעים נגד האנושות שביצע חמאס @elonmusk
— Benjamin Netanyahu - בנימין נתניהו (@netanyahu) November 27, 2023
(צילום: עמוס בן גרשום, לע״מ) pic.twitter.com/aipX6ryv7T
हमासच्या हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या किबुत्झ काफ्र आझा येथे नेतन्याहू यांच्यासोबत मस्कही गेले होते. या भेटीचा फोटो शेअर करताना नेतन्याहू यांनी सोशल मीडिया X वर लिहिले की, "हमासने मानवतेविरुद्ध केलेले गुन्हे जवळून दाखवण्यासाठी मी इलॉन मस्कसोबत किबुट्झ कफार अजाची भेट घेतली."
इस्रायल आणि हमास यांच्यातील करारानुसार शुक्रवारपासून (24 नोव्हेंबर) चार दिवसांचा युद्धविराम सुरू आहे. या अंतर्गत इस्रायलमध्ये कैद आणि पॅलेस्टाईन-गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या लोकांची सुटका केली जात आहे. करारानुसार इस्रायलने 39 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली तर हमासने 13 ओलिसांची सुटका केली. 7 ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर हा पहिलाच युद्धविराम आहे.