इस्रायल-हमास युद्ध, तुर्की संसदेनं कोका-कोला अन् नेस्लेवर घातली बंदी, असं आहे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 04:41 PM2023-11-08T16:41:05+5:302023-11-08T16:43:44+5:30
इस्रायल-हमास युद्ध सुरू असतानाच, तुर्कीच्या संसदेने आपल्या रेस्टॉरंटमधील अशा अनेक उत्पादनांच्या वापरावर बहिष्कार टाकला आहे...
इस्रायल-हमास युद्ध सुरू असतानाच, तुर्कीच्या संसदेने आपल्या रेस्टॉरंटमधील अशा अनेक उत्पादनांच्या वापरावर बहिष्कार टाकला आहे, जी कथितपणे 'इस्रायली आक्रमकतेचे' समर्थन देतात. यासंदर्भात बोलताना, तुर्की संसदेचे अध्यक्ष नोमान कर्तुलमस यांनी म्हटले आहे की, जी उत्पादने इस्रायलच्या आक्रमतेचे समर्थन करतात, अशा उत्पादनांचा वापर संसद करणार नाही. तुर्कीच्या उत्तर प्रांतातील ओरदू येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.
टीआरटी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, नोमान कर्तुलमस म्हणाले, "आम्ही तुर्की ग्रँड नॅशनल असेंब्लीमध्ये, इस्त्रायली आक्रमकतेचे समर्थन करणार्या कंपन्यांच्या कुठल्याही उत्पादनांचा वापर करणार नाही. आम्ही यापुढे, अशा कंपन्यांकडून काहीही खरेदी करणार नाही आणि आतापर्यंत जे खरेदी केले आहे, ते फेकून देऊ." मात्र, संसदेच्या रेस्टॉरंटमध्ये नेमक्या कोणत्या कंपन्यांच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे, यासंदर्बात त्यांनी दिलेली नाही.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, तुर्कीच्या संसदेने कोका-कोला आणि नेस्लेच्या उत्पादनांचा बहिष्कार केला आहे. एवढेच नाही, तर, वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, कोका-कोला आणि नेस्लेला संसदेच्या रेस्टॉरंटच्या मेन्यूतून हटविण्यात आले आहे.
गाझातून माघार नाही, ओलिसांची सुटका झाल्याशिवाय युद्धविराम नाही -
जोवर ओलिसांची सुटका होत नाही, तोवर युद्धविराम नाही. गाझातून माघार घेणार नाही. गाझातील युद्धसंघर्षात शस्त्रसंधी करणार नाही, अशी ठाम भूमिका इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत १०,३२८ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ४,२३७ मुलांचा समावेश आहे.