हमासच्या हल्ल्यापुढे इस्त्रायलचं १०० कोटी डॉलर्सचं 'आयर्न डोम' नापास झालं? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 04:28 PM2023-10-08T16:28:17+5:302023-10-08T16:29:50+5:30
Iron Dome Failure: इस्त्रायलचं ब्रह्मास्त्र समजलं जाणाऱ्या 'आयर्न डोम'ची कमकुवत बाजू हमासने बरोबरी ओळखली. नक्की काय घडलं, वाचा सविस्तर...
पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने गाझामधून 5000 रॉकेट डागून इस्रायलवर धक्कादायक हल्ला केला. या हल्ल्यात 200 हून अधिक इस्रायली ठार झाल्याचे वृत्त आहे तसेच 1600 लोक जखमी झाले आहेत. हे हल्ले रोखण्यात इस्रायली लष्कराचे ब्रह्मास्त्र समजले जाणारे 'आयर्न डोम' कसे अपयशी ठरले याची सध्या चर्चा सुरू आहे. 'आयर्न डोम'ने अनेक रॉकेट हल्ले परतवून लावले आहेत पण आज हेच आयर्न डोम इस्रायलमध्ये काही लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. इस्रायलची अब्जावधी डॉलर्सची यंत्रणा पूर्णपणे निकामी ठरली, असे काय झाले असेल, जाणून घेऊया.
आयर्न डोम काय करू शकतं?
एक अब्ज डॉलर्सच्या आयर्न डोमच्या अपयशाला तज्ज्ञ 'निराशाजनक' म्हणत आहेत . इस्रायलची भक्कम संरक्षण यंत्रणा अपयशी ठरणे हा लष्करापुढे मोठा प्रश्न आहे. आयर्न डोमबद्दल असे म्हटले जाते की ते कोणतेही हल्ले नष्ट करण्यासाठी 90 टक्के प्रभावी आहे. मात्र शनिवारी ते पॅलेस्टाईनमधून येणाऱ्या हजारो रॉकेटचा सामना करू शकले नाही. शनिवारी झालेल्या हल्ल्यात गाझा पट्टीच्या आत आयर्न डोम यंत्रणा किती प्रभावी होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इस्रायलची आयर्न डोम सिस्टीम कमी पल्ल्याच्या हवाई धोक्यांना तटस्थ करण्यासाठी प्रभावी आहे. तसेच ही यंत्रणा हवेतील कोणतेही क्षेपणास्त्र पूर्णपणे थांबवू शकते. पण हमासने त्याची कमकुवत बाजू ओळखली.
हमासला सापडला 'वीक पॉईंट'
या प्रणालीची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ती रॉकेटचा प्रक्षेपण मार्ग, त्याचा वेग आणि लक्ष्य शोधू शकेल. अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेनंतर ही यंत्रणा हवेतच क्षेपणास्त्र नष्ट करते करू शकते. अत्याधुनिक सेन्सर्सने सज्ज असलेली ही इस्रायली संरक्षण यंत्रणा हमासच्या हल्ल्यात कशी अयशस्वी ठरली हे कोणालाच समजू शकलेले नाही. हमासच्या दहशतवाद्यांनी डागलेले रॉकेट इस्रायलमध्ये प्रवेश करताच ती यंत्रणा कुचकामी ठरली. हमास अनेक वर्षांपासून आयर्न डोममध्ये कमकुवतपणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. शनिवारी अल्पावधीत अनेक रॉकेट डागून हे करण्यात दहशतवादी गटाला यश आले. एकाच वेळी अनेक रॉकेटचा पाऊस रोखण्यात ही संरक्षण यंत्रणा अपयशी ठरली असल्याचा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.
2011 मध्ये प्रथम तैनात
आयर्न डोम सिस्टीमची पहिले युनिट मार्च 2011 मध्ये गाझा पट्टीपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिणेकडील बेरशेवा शहराजवळ तैनात करण्यात आली होती. हे ठिकाण हमासचे नेहमीच आवडते लक्ष्य राहिले आहे. इस्रायलकडे आता अशी किमान 10 युनिट्स आहेत. आयर्न डोम असे म्हटले जाते की ते हवाई धोके ओळखण्यासाठी आणि दूर करण्यासाठी रडार वापरतात. हे अशा प्रकारे विकसित केले गेले आहे की ते गाझामधून डागलेल्या रॉकेटला सामोरे जाण्यासाठी प्रभावी सिद्ध होऊ शकते. आयर्न डोमवरील प्रत्येक बॅटरीमध्ये रडार डिटेक्शन आणि ट्रॅकिंग सिस्टम, फायरिंग कंट्रोल सिस्टम आणि 20 इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांसाठी तीन लाँचर्स आहेत. आयर्न डोम राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिमने बनवलं आहे. 2011 मध्ये लॉन्च झाल्यापासून, ते इस्रायलच्या संरक्षणाचा सर्वात मोठा भाग बनला आहे.