इस्त्रायलने दहशतवादी संघटना हमासवरील हल्ल्याचा दुसरा टप्पा सुरु केलेला असताना अमेरिकी खासदाराचे खळबळ उडविणारे वक्तव्य आले आहे. गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची इस्रायलला परवानगी मिळाली पाहिजे, असे वक्तव्य लिंडसे ग्राहम यांनी केले आहे. याचबरोबर लिंडसे यांनी जपानवर अमेरिकेने टाकलेले अणुबॉम्ब हा योग्य निर्णय होता, असेही या खासदाराने म्हटले आहे.
इस्रायलने एक यहुदी देश म्हणून स्वत:ला वाचविण्यासाठी जे काही करावे वाटत आहे ते करावे,असे लिंडसे यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिकेने इस्रायलला पुरविला जाणारी ३००० ब़ॉम्बची डिलिव्हरी रोखली, यावरही त्यांनी टीका केली आहे. आम्ही जसे पर्ल हार्बर उध्वस्त होताना पाहिले, नागासाकी आणि हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकून युद्ध संपविले तसेच गाझाचे युध्द संपविण्यासाठी इस्रायलला अणुबॉम्ब द्यायला हवेत. ते हे युद्ध हरू शकत नाहीत, असे लिंडसे यांनी म्हटले आहे.
गाझामध्ये नागरिकांच्या मृत्यूसाठी इस्रायलला नाही तर हमासला जबाबदार ठरवायला हवे. कारण हमासने या नागरिकांचा ढालीप्रमाणे वापर केला आहे. हमास या लोकांचा ढालीप्रमाणे वापर करणे बंद करत नाही तोवर या लोकांचा मृत्यू कमी करणे अशक्य असल्याचे लिंडसे म्हणाले. सामान्य नागरिकांना संकटात टाकणारे असे कोणतेही युद्ध मी इतिहासात पाहिलेले नाही, असे लिंडसे यांनी सांगितले.