Israel war: दोन कारणं, ज्यामुळे अमेरिका इस्राइलला डोळे झाकून देते पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 10:59 AM2023-10-10T10:59:47+5:302023-10-10T11:00:08+5:30
Israel war: हमाससोबत संघर्षाला तोंड फुटल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेने या प्रसंगात इस्राइलला पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली. दरम्यान, विषय कुठलाही असला तरी अमेरिका इस्राइलला साथ देते. याची दोन प्रमुख कारणं आहेत. ती पुढीलप्रमाणे.
शनिवारी सकाळी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर सुमारे पाच हजार रॉकेटच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला. हमासच्या या हल्ल्यानंतर इस्राइलकडून गाझापट्टीवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या संघर्षात आतापर्यंत एक हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्राइली नागरिकांसह काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, या संघर्षाला तोंड फुटल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेने या प्रसंगात इस्राइलला पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली. इस्राइल गंभीर संकटाचा सामना करत आहे. या परिस्थितीत अमेरिका त्याला पूर्ण साथ देईल, असे अमेरिकेने ठामपणे सांगितले आहे. दरम्यान, विषय कुठलाही असला तरी अमेरिका इस्राइलला साथ देते. याची दोन प्रमुख कारणं आहेत. ती पुढीलप्रमाणे.
इस्राइलसोबत अमेरिका असण्यातलं पहिलं कारण म्हणजे मध्य-पूर्वेतील राजकीय परिस्थिती. येथील राजकीय स्थितीमुळे इस्राइलला साथ देणं अमेरिकेला भाग आहे. पॅलेस्टाइनला इस्लामिक देश ज्याप्रमाणे पाठिंबा देतात. ते अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी चांगलं मानलं जात नाही. अमेरिकेचा मध्य पूर्वेत दबदबा राखायचा असेल, तर कट्टर इस्लामिक विचारांना विरोध करणाऱ्या एका देशाची आवश्यकता आहे, असं अमेरिकन रणनीतिकारांचं मत आहे. इस्राइल हा इस्लामिक कट्टरतावादाविरोधात उभा राहणारा देश असल्याने अमेरिकेचा नेहमी त्याला पाठिंबा मिळतो.
त्याशिवाय अमेरिकन अर्थव्यवस्थेवर ज्यू लॉबीचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे अमेरिकेत कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी जेव्हा इस्राइलचा प्रश्न येतो तेव्हा तेथील सरकारला इस्राइलच्या बाजूने उभं राहावं लागतं. त्यामुळेच जेव्हा कधी इस्राइलची सुरक्षा किंवा इतर प्रश्न निर्माण होतो तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिक किंवा डेमोक्रॅटिक कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी तेथे इस्राइलला पाठिंब्याचा निर्णय घेतला जातो.