हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलमध्ये भीषण परिस्थिती आहे. दहशतवाद्यांनी लोकांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली आहे. यामध्ये इस्रायली अमेरिकन कुटुंबाचाही समावेश होता. मृत्यूपूर्वी त्यांनी नातेवाईकांना शेवटचा मेसेज पाठवला होता, जो आता जोरदार व्हायरल होत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, घराचे प्रमुख योनातन केदम सिमन टोव यांनी त्यांची बहीण रेनी बटलरला पाठवलेल्या मेसेजमध्ये "ते येथे आहेत. ते आम्हाला जाळत आहेत. आम्ही श्वास घेऊ शकत नाही असं म्हटलं आहे.
35 वर्षीय टोव, त्याची 35 वर्षीय पत्नी तामार, 6 वर्षांच्या जुळ्या मुली शाहर आणि अरबेल, 4 वर्षांचा मुलगा ओमर आणि 70 वर्षांची आई कॅरोल यांना दहशतवाद्यांनी ठार केलं. गाझा सीमेजवळ असलेल्या किबुत्झच्या निर ओजमध्ये हे लोक राहत होते. हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर हे कुटुंब प्रथम 'सेफ रूम'मध्ये गेलं. त्यानंतर त्यांनी नातेवाईक आणि मित्रांना मेसेज करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी सांगितले की आम्ही ठीक आहोत आणि शेल्टरमध्ये आहोत. अशाच प्रकारे आणखी अनेक मेसेज पाठवण्यात आले. पण तासाभराने मेसेज येणं बंद झालं.
हमासचे दहशतवादी त्यांच्या घरात घुसले आणि सेफ रूममध्ये पोहोचले. यानंतर त्यांच्याकडून कोणालाच मेसेज पाठवला गेला नाही. मैत्रीण यिशाई लाकोवने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, 'आम्ही तामारला अनेक वर्षांपासून ओळखतो, कारण तिने विद्यापीठाच्या अभ्यासादरम्यान मला एका खास कार्यक्रमात नेलं. आमचे हृदय तुटलं आहे. दुष्ट मारेकर्यांनी संपूर्ण कुटुंबाची हत्या केली, मुलं आणि पालकांना केवळ ज्यू असल्यामुळे गोळ्या घातल्या. हे असह्य आहे!'
यिशाईने पुढे लिहिलं की, "इस्रायलमधील आमचे भाऊ, मित्र आणि शेजारी... सर्वांना कर्तव्यासाठी बोलावण्यात आले आहे आणि त्यांच्यापैकी बरेच गाझा सीमेकडे जात आहेत. त्यांपैकी बरेच जण गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात पत्नी आणि लहान मुलांना सोडून जात आहेत. भीती आणि तणाव आश्चर्यचकित करणारा आहे आणि आम्ही सैनिकांचे हात बळकट करून त्या सर्वांना सुखरूप घरी परत आणण्यासाठी देवावर विश्वास ठेवतो." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.