सिगारेट, शॅम्पेन स्वीकारल्याने इस्त्रायलचे पंतप्रधान अडकले भ्रष्टाचाराच्या प्रकरणात, अटक होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 11:53 AM2018-02-14T11:53:23+5:302018-02-14T11:57:35+5:30
भ्रष्टाचाराच्या दोन वेगवेगळया प्रकरणात इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना अटक होऊ शकते. त्यांच्या विरोधात खटला चालवण्याइतपत सबळ पुरावे मिळाल्याचा दावा इस्त्रालयच्या पोलिसांनी मंगळवारी केला.
जेरुसलेम - भ्रष्टाचाराच्या दोन वेगवेगळया प्रकरणात इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना अटक होऊ शकते. त्यांच्या विरोधात खटला चालवण्याइतपत सबळ पुरावे मिळाल्याचा दावा इस्त्रालयच्या पोलिसांनी मंगळवारी केला. नेतान्याहू यांच्याविरोधात लाच स्वीकारणे, घोटाळा आणि विश्वासघात केल्याचे पुरावे मिळाले आहेत असे मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नेतान्याहू यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे आणि तथ्यहीन असून काहीही हाती लागणार नाही असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. नेतन्याहू यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांसंबंधी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नॉरेट यांना विचारले असता त्या म्हणाल्या कि, अमेरिकेचे फक्त पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याबरोबरच नव्हे तर संपूर्ण इस्त्रायली सरकारबरोबर घनिष्ठ संबंध आहेत. नेतन्याहू यांच्यावरील आरोपांची आम्हाला कल्पना आहे पण तो इस्त्रायलचा अंतर्गत विषय आहे.
नेतान्याहू यांच्यावर परदेशातील उद्योजकांकडून सिगारेट, शॅम्पेन, ज्वेलरी स्वीकारल्याचा आरोप आहे. 2007 ते 2016 दरम्यान स्वीकारलेल्या या गिफ्टसची एकूण किंमत दोन लाख 80 हजार डॉलर्सच्या घरात जाते. अब्जोपती आणि हॉलिवूडचा निर्माता अरनॉन मिलचान याच्याबरोबर नेतान्याहू यांचे आर्थिक हितसंबंध गुंतल्याचा आरोप आहे. या गिफ्टसच्या मोबदल्यात नेतान्याहू यांनी मिलचानला करात सवलत देण्याचा प्रयत्न केला असा आरोप पोलिसांनी केला आहे.