एअर स्ट्राईकबाबत नवा खुलासा; 190 दहशतवादी ठार, तर 45 दहशतवादी अद्यापही रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 09:32 AM2019-05-09T09:32:17+5:302019-05-09T09:33:42+5:30
विरोधकांनी एअर स्ट्राईकवर संशय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र भारताच्या या एअर स्ट्राईकबाबत इटलीतील एका शोध पत्रकाराने नवीन खुलासा समोर आणला आहे.
नवी दिल्ली - जम्मू काश्मीर येथे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानच्या बालकोटभागात एअर स्ट्राईक करण्यात आले. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात आला. मात्र विरोधकांनी एअर स्ट्राईकवर संशय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र भारताच्या या एअर स्ट्राईकबाबत इटलीतील एका शोध पत्रकाराने नवीन खुलासा समोर आणला आहे.
इटलीतील या पत्रकाराने पाकिस्तानचा दावा खोटा ठरवत भारतीय हवाई दलाने बालकोटमध्ये केलेल्या हल्ल्यात जवळपास 170 दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 20 दहशतवाद्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आजही 45 दहशतवादी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती दिली आहे.
भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालकोट भागात घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांना टार्गेट केलं होतं. या हल्ल्याने पाकिस्तानची झोप उडाली. भारतीय हवाई दलाचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याचं पाकिस्तानचे मान्य केलं असलं तरी आमच्या डोंगराळ भागात झाडांवर बॉम्ब फेकून पळून गेल्याचा खोटा आरोप पाकिस्तानने केला. मात्र इटलीतील पत्रकाराच्या या रिपोर्टमुळे पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं.
43 दिवसानंतर बालकोटमध्ये पोहचले पत्रकार, प्रश्नांना उत्तर देताना पाक सैन्याची उडाली भंबेरी
इटलीतील पत्रकार फ्रांसिसा मारिनो यांनी मागील दोन-तीन महिन्यांपासून केलेल्या शोधमोहीमेत त्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा रिपोर्ट समोर आणला आहे. ज्यातून भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचं समोर आलंय.
इटलीतील स्ट्रिंगरएशिया डॉटआईटी यांनी छापलेल्या अहवालात मारिनो यांनी बालकोट एअर स्ट्राईकचा अहवाल छापला आहे. भारतीय हवाई दलाची विमाने पहाटे 3.30 च्या सुमारास बालकोट भागात घुसली. हा हल्ला झाल्यानंतर जवळपास पहाटे 6 वाजता घटनास्थळावर पाकिस्तान सेनेची एक तुकडी पोहचली. या तुकडीने जखमी दहशतवाद्यांना तात्काळ रुग्णालयात पोहचवलं. एअर स्ट्राईकचं सत्य लपविण्यासाठी पाकिस्तानने या जखमी दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं.
अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य
निवडणुकीमध्ये भाजपाकडून एअर स्ट्राईकचा वापर करण्यात येत असल्याने विरोधकांकडून नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आलं. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी एअर स्ट्राईकबाबत केंद्राला पुरावे मागितले तर पाकिस्तानला फायदा होईल अशी वक्तव्य काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येतात असा आरोप भाजपाकडून काँग्रेसवर केला जातो. मात्र या रिपोर्ट निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी भाजपाला दिलासा मिळेल हे नक्की.