इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पुढील महिन्यात येणार भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 10:37 AM2017-10-19T10:37:55+5:302017-10-19T17:14:28+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच पुढील महिन्यात भारतात येणार असल्याचंही इवांका यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी इवांका ट्रम्प यांना जागतिक उद्योजगता परिषदेचं नेतृत्व भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याच निमंत्रणानुसार नोव्हेंबर महिन्यात इवांका ट्रम्प भारतात येणार आहेत. पुढील महिन्यात हैदराबादमध्ये ही परिषद होणार आहे.
Wishing Hindus, Sikhs & Jains around the world a joyful #Diwali. Saal Mubarak to all! Looking forward to my visit to India for #GES2017. pic.twitter.com/O1tmiFzECc
— Ivanka Trump (@IvankaTrump) October 18, 2017
सर्व हिंदू, शीख, जैन तसंच जगभरात दिवाळी साजरी करणाऱ्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. पुढील महिन्यातील भारत दौऱ्याची वाट पाहते आहे, असं इवांका ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
दोन दिवसांपूर्वीचं इवांका ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली होती. अमेरिकी सरकार व प्रशासनातील भारतीय वंशाचे, तसेच भारतीय प्रतिनिधी व अधिकारी या वेळी उपस्थित होते. ट्रम्प यांची कन्या इवांका हीदेखील दिवाळी समारंभात सहभागी झाली होती. समारंभाचा भाग म्हणून ट्रम्प यांनी दीप प्रज्वलनही केले.
अमेरिकेच्या विकासात भारतीयांचे मोठे योगदान असल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी या वेळी केला. स्वत: ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमधील दिवाळीची पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली. दिवाळी हा हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण आहे आणि आमच्यासाठी दिवाळी हा जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताविषयी आणि भारतीयांविषयीही कृतज्ञता व्यक्त करण्याचा अभिमानास्पद क्षण आहे.
भारतीय वंशाचे नेते व प्रशासनातील अधिकारी यांच्यासह हा प्रकाशाचा सण साजरा करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचाही ट्रम्प यांनी उल्लेख केला आहे.
बुशपासून परंपरा सुरू
व्हाइट हाउसमध्ये दिवाळी उत्सव साजरा करण्याची परंपरा अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी सुरू केली होती. त्यानंतरच्या अध्यक्षांनी ती कायम ठेवली. या आधी बराक ओबामा यांनीही व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी केली होती. त्या निमित्ताने ते अनेक भारतीयांना भेटलेही होते.
‘मुबारक’ शब्दावरून टीका
भारतीय वंशाच्या नागरिकांची मोठी संख्या असलेल्या कॅनडाचे तरुण पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ यांनी ओटावा शहरात भारतीय समाजासोबत दिवाळी साजरी केली. याचा फोटो शुभेच्छांसह टिष्ट्वटरवर टाकला. मात्र, यात ‘दिवाळी मुबारक’ असा शब्दप्रयोग केल्याबद्दल त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.