वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर जो बायडन यांनी बाजी मारली असून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, लवकरच जो बायडन हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये पाऊल ठेवतील. दुसरी विशेष बाब म्हणजे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांना संधी मिळणार आहे. कमला हरीस यांची उपराष्ट्राध्यक्षपदासाठी निवड झाली आहे.
न्यायालयीन लढाईनंतर अखेर जो बायडन यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असून अमेरिकन नागरिकांचे आभार मानले आहेत. बायडन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देताना, भावूक पोस्ट लिहिली आहे. 'अमेरिका, या महान देशाचं नेतृत्व करण्यासाठी तुम्ही माझी निवड केली आहे. हा माझा सन्मान आहे. आपल्या सगळ्यांपुढचं आव्हान खडतर आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असणार आहे, तुम्ही मला मत दिलं असो किंवा नाही. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा माझा प्रयत्न असेल", असं जो बायडन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
कमला हॅरीस या डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार असून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरीस यांच्या नावाची घोषणा केली होती. आता डेमोक्रेटीक पक्षाने अमेरिकेतील निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केल्यामुळे कमला हॅरीस यांनाही उपराष्ट्रपती पदाचा सन्मान मिळणार आहे. अमेरिकेतील या महत्त्वाच्या पदासाठी निवडणूक लढवणारी पहिली कृष्णवर्गीय महिला म्हणून कमला हॅरीस मैदानात उतरल्या होत्या. कमला हॅरीस यांचं मूळ भारतीय असून भारताशी त्यांचं जवळचं नातं आहे.
हॅरिस यांची आई शामला गोपालन म्हणजे भारतीय आणि वडील डोनल्ड हॅरिस म्हणजे जमैकन. वडील ख्रिस्ती, आई हिंदू. कमला ब्लॅक बॅप्टिस्ट चर्चमधे जातात. नवरा डग्लस एमहॉफ हा ज्यू आहे. सहा वर्षापूर्वी कमलाचं लग्न झालं. डग्लसच्या दोन मुली आता त्यांच्या मुली आहेत. त्या कमलाला मॉमला म्हणतात. कमला हॅरीस यांचं भारताशी नात असल्यामुळेच तामिळनाडूतील थुलासेंद्रपुरम या गावात उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून कमला हरीस यांचे पोस्टर्स झळकले होते. येथील गावकऱ्यांनी बॅनरबाजी करत कमला हॅरीस यांना आपला पाठिंबा दर्शवला होता.
दरम्यान, अमेरिकेच्या दोन्ही प्रमुख पक्षांनी आत्तापर्यंत कुठल्याही कृष्णवर्णीय महिलेस राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार बनवले नाही. तसेच, आजपर्यंत एकही महिला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली नाही. मात्र, उपराष्ट्रपतीपदी आता भारतीय वंशाच्या कमाल हॅरीस यांची वर्णी लागली आहे.