Jammu And Kashmir: संयुक्त राष्ट्रात चीनचे पाकच्या सुरात सूर; भारताला रशियाचं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:04 PM2019-08-16T22:04:01+5:302019-08-16T22:11:54+5:30

चीनच्या मागणीनुसार काश्मीरच्या मुद्द्यावर बोलावलेली संयुक्त राष्ट्रातल्या सुरक्षा परिषदेची बैठक संपली आहे.

Jammu And Kashmir: Entirely Internal Matter," Says India After UNSC Closed Door Meet | Jammu And Kashmir: संयुक्त राष्ट्रात चीनचे पाकच्या सुरात सूर; भारताला रशियाचं समर्थन

Jammu And Kashmir: संयुक्त राष्ट्रात चीनचे पाकच्या सुरात सूर; भारताला रशियाचं समर्थन

googlenewsNext

वॉशिंग्टनः चीनच्या मागणीनुसार काश्मीरच्या मुद्द्यावर बोलावलेली संयुक्त राष्ट्रातल्या सुरक्षा परिषदेची बैठक संपली आहे. संयुक्त राष्ट्रात चीनचे पाकच्या सुरात सूर मिसळले असून, भारताच्या बाजूनं नेहमीप्रमाणे रशिया उभा राहिला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी दूत अकबरुद्दीन म्हणाले, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणं हा भारताचा अंतर्गत विषय आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर बाहेरच्या लोकांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. जिहादच्या नावावर पाकिस्तान हिंसा पसरवतोय. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. पाकिस्तानला दहशतवादाला पोसणं थांबवावं लागेल, त्यानंतरच काश्मीरचा मुद्दा चर्चेतून सोडवणं शक्य आहे.

संयुक्त राष्ट्रातील बैठक संपल्यानंतर चिनी राजदूतानं सांगितलं की, भारतानं जे संवैधानिक संशोधन केलं आहे, त्यामुळे सद्याची परिस्थिती बदलली आहे. काश्मीरची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षानं एकतर्फी निर्णय घेऊ नये. अशा प्रकारे निर्णय घेऊन त्याला वैध ठरवता येणार नाही. खरं तर केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तान वारंवार संयुक्त राष्ट्रात जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची मागणी करत आहे. पाकिस्तानसाठी काश्मीर हा गळ्यात अडकलेला काटा बनला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्ताननं हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला. परंतु चीन सोडल्यास इतर कोणत्याही देशानं त्याला प्रतिसाद दिलेला नव्हता. संयुक्त राष्ट्राच्या परिषदेतही आता चीन सोडल्यास इतर सर्वच देशांनी भारताला समर्थन दिलं आहे. संयुक्त राष्ट्रासारख्या संस्थेला बंद खोलीत बैठक घ्यावी लागली हे काही पहिल्यांदाच घडलं नाही. काश्मीरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात ही दुसऱ्यांदा बैठक झाली आहे. तत्पूर्वी पहिली बैठक 1971मध्येही याच मुद्द्यावर झाली होती. यूएनएससीची सदस्य संख्या 15 आहे, ज्यात 5 स्थायी आणि 10 अस्थायी सदस्य देश आहेत. अस्थायी सदस्य देशांचा कार्यकाळा काही वर्षांचा असतो, तर स्थायी सदस्य हे कायम राहतात. अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स हे संयुक्त राष्ट्रातले स्थायी सदस्य आहेत. अस्थायी सदस्यांमध्ये बेल्जियम, कोट डिवोएर, डोमिनिक रिपब्लिक, इक्वेटोरियल गुएनी, जर्मनी, इंडोनेशिया, कुवेत, पेरू, पोलंड आणि दक्षिण आफ्रिकेसारखे देश आहेत. जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक आणि कलम 370 हटविण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरात अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-कॉलेज आणि सरकारी कार्यालये येत्या सोमवारपासून खुले करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. 

Web Title: Jammu And Kashmir: Entirely Internal Matter," Says India After UNSC Closed Door Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.