Japan Moon Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO ने चंद्रयान ३ मोहीम यशस्वी करून दाखवली. रशियानेही याचवेळी चंद्रावर झेपावण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र, रशियाचे लूना-२५ क्रॅश झाले आणि मोहीम फसली. मात्र, भारताने ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आणि जगाला प्रेरणा मिळाली. भारताच्या पावलावर पाऊल ठेवत आता जपानने मून मिशन लॉन्च केले असून, जपानने आपले रॉकेट HII-A चे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. ०७ सप्टेंबर २०२३ रोजी जपान स्पेस सेंटर येथून पहाटे ५ वाजून १२ मिनिटांनी जपानचे रॉकेट चंद्राकडे झेपावले.
HII-A रॉकेटसोबत जपानने दोन अंतराळ यान लॉन्च केली. या मोहिमेचे नाव SLIM असे ठेवण्यात आले आहे. जपानने चंद्रावर एक एक्स-रे टेलिस्कोप आणि एक छोटे लँडर पाठवले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जपान पाचवा देश ठरेल. पहाटे लाँच झाल्यानंतर दोन टप्प्यांमध्ये टेलिस्कोप आणि लँडर रॉकेटपासून वेगळे झाले. जपानचे यान फेब्रुवारी महिन्यात चंद्रावर लँड करणार आहे.
चंद्रावरील समुद्राजवळ उतरणार यान?
जपानचे स्लिम लँडर चंद्राच्या जवळच्या बाजूला म्हणजेच आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या भागात उतरणार आहे. चंद्राचा समुद्र म्हणतात, अशा भागात जपानचे यान उतरेल, असे म्हटले जात आहे. हे ठिकाण चंद्रावरील सर्वात गडद ठिकाण मानले जाते. SLIM हे अत्यंत प्रगत ऑप्टिकल आणि इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. SLIM हे चंद्राच्या पृष्ठभागावरील ऑलिव्हिन दगडांची तपासणी करेल, जेणेकरून चंद्राची उत्पत्ती कळू शकेल, असे म्हटले जात आहे.
चंद्रावर जाण्याचा जपानचा दुसरा प्रयत्न
जपानच्या चांद्र मोहिमेची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, काही ना काही कारणांमुळे हे प्रक्षेपण पुढे ढकललं जात होतं. यापूर्वी २५ ऑगस्ट रोजी याचे प्रक्षेपण होणार होते. मात्र, खराब हवामानामुळे ते प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. जपानने यापूर्वीही चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अपयशी ठरला. जपान या मोहिमेत चंद्रावर एक 'एक्स-रे इमेजिंग अँड स्पेक्ट्रोस्कोपी मिशन' म्हणजेच XRISM नावाचा टेलिस्कोप पाठवणार आहे. सोबतच 'स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिंग मून' (SLIM) हे लँडर अगदी कमी जागेत चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे याला 'स्नायपर' असेही म्हटले जात आहे.
दरम्यान, जपानच्या या चंद्र मोहिमेसाठी सुमारे ८३१ कोटी रुपयांचा खर्च आल्याचे म्हटले जात आहे. H2-A रॉकेट हे जपानचं सर्वात विश्वासार्ह रॉकेट आहे. जपानची अंतराळ संशोधन संस्था JAXA ने यापूर्वी ४२ उड्डाणांमध्ये याचा वापर केला होता. यापैकी ४१ उड्डाणे यशस्वी होती. यानंतर मून मिशनचे उड्डाण यशस्वीपणे पार पाडून या रॉकेटने आपली कामगिरी कायम ठेवली आहे.