टोकियो - लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक खास गोष्ट असते. मात्र सामान्य माणसाशी विवाह केल्याने एका राजकुमारीला शाही थाट सोडावा लागणार आहे. जपानच्या राजकुमारीने शाही कुटुंबाव्यतिरिक्त एका सर्वसामान्य माणसाशी लग्न केले आहे. 28 वर्षीय राजकुमारी अयाको हिने निपन युसेन या शिपिंग कंपनीत काम करणाऱ्या 32 वर्षीय केई मोरियाशी विवाह केला आहे. त्यामुळेच राजकुमारीला तिचा शाही थाट सोडावा लागणार आहे.
राजकुमारी अयाकोने टोकियोतील मेईजी मंदिरामध्ये विवाह केला. अयाको ही सम्राटांच्या चुलतभावाची कन्या आहे. जपानमधील न्यूज चॅनलवर अयाको आणि तिचे काही नातेवाईक मंदिरात असल्याचं दाखवण्यात आले होते. विवाहानंतर या नव दाम्पत्याने एका पत्रकार परिषदेतही भाग घेतला. शाही कुटुंबात विवाह करणाऱ्या महिला या राजेशाही घराण्याचा भाग असतात. मात्र सर्वसामान्य लोकांशी लग्न करणारे सदस्य यातून बाहेर होतात. शाही थाट सोडल्यानंतर राजकुमारीला खर्चासाठी जपानच्या सरकारकडून जवळपास 7 कोटी रुपये दिले जाणार आहेत.