जपान तयार करतोय जगातील पहिलं 'लाकडी सॅटलाइट'!; अंतराळातील प्रदुषणावर तोडगा
By मोरेश्वर येरम | Published: January 1, 2021 06:42 PM2021-01-01T18:42:22+5:302021-01-01T18:44:58+5:30
२०२३ सालापर्यंत अवकाशातील निरुपयोगी उपकरणांच्या अडचणीवर मात करण्यासाठी जपानची क्योटो यूनिव्हर्सिटी आणि कंस्ट्रक्शन कंपनी Sumitomo Forestry एकत्र आले आहेत.
क्योटो
अमेरिकेच्या 'नासा' या अवकाश संशोधन केंद्राच्या माहितीनुसार अवकाशात सध्या ५ लाखांहून अधिक निरुपयोगी तुकडे पृथ्वीभोवती घिरट्या घालत आहेत. यातील अनेक तुकडे हे अतिशय वेगानं फिरत असून यातून सॅटलाइट आणि उपग्रहांचं नुकसान होऊ शकतं. या निरुपयोगी तुकड्यांमुळे अवकाशातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रालाही धोका निर्माण झाला आहे.
२०२३ सालापर्यंत अवकाशातील निरुपयोगी उपकरणांच्या अडचणीवर मात करण्यासाठी जपानची क्योटो यूनिव्हर्सिटी आणि कंस्ट्रक्शन कंपनी Sumitomo Forestry एकत्र आले आहेत.
येत्या काळात 'लाकडी सॅटलाइट' तयार करण्यासाठी जपान प्रयत्न करत आहे. अवकाशातील प्रदुषण हा अतिशय चिंतेचा विषय आहे, असं जपानचे अंतराळवीर तकाओ दोई सांगतात. सॅटलाइट आपलं काम झाल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर परतत असताना जळून जाते आणि त्याचा ठिगारा वर्षानुवर्षे अंतराळात फिरत राहतो. याचा पर्यावरणवर दुष्परिणाम होत आहे. 'नासा'च्या माहितीनुसार हे तुकडे अवकाशात तब्बल १७,५०० किमी प्रतितास वेगाने फिरत असतात.
लाकडी उपग्रहाचा फायदा काय?
जपानने अंतराळातील प्रदुषणावर मात करण्यासाठी लाकडी सॅटलाइट तयार करण्यावर काम सुरू केलं आहे. तापमानात होणारे बदल आणि सूर्याच्या प्रखर किरणांना झेलू शकेल इतक्या क्षमतेचा सॅटलाइट तयार करण्यात येत आहे. यासाठी पृथ्वीवरील विविध परिस्थितींमध्ये लाकडाचे परिक्षण केले जात आहे. लाकडी सॅटलाइट त्यांचं अवकाशातील काम पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीवर परतत असताना पूर्णपणे जळून राख होतील आणि त्याचे कोणतेही अवशेष अवकाशात राहणार नाहीत, यावर संशोधन केलं जात आहे.