टोकियो : जपानचे लोकप्रिय सम्राट अकिहितो (८५) यांनी मंगळवारी स्वेच्छेने राज्यत्याग केला. अखंडपणे २०० वर्षे सुरू असलेली जपानची राजेशाही ही जगातील सर्वात जुनी राजेशाही असून, त्यातील कोणाही सम्राटाने स्वत:हून राजसिंहासनावरून पायउतार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. टोकियोच्या राजप्रासादाच्या ‘पाईन दालनात’ सम्राट अकिहितो यांनी आपली राज्यवस्त्रे, तलवार आणि पवित्र मानला जाणारा मुकुटमणी उतरवून ठेवला. पावसाची संततधार सुरू असूनही सम्राटांच्या शेकडो चाहत्यांनी व हितचिंतकांनी राजप्रासादाबाहेर हजेरी लावली. आत झालेल्या समारंभात पंतप्रधान शिन्झो अबेव राजघराण्यातील सुमारे डझनभर सदस्यांसह अंदाजे ३०० लोक उपस्थित होते.
सम्राट या नात्याने केलेल्या शेवटच्या भाषणात अकिहितो यांनी जपानच्या प्रजेचे मनापासून आभार मानले व जपानसह संपूर्ण जगात शांतता आणि आनंद नांदावा, अशी कामना केली. गुलाबी आणि सोनेरी रंगाची भरजरी राजवस्त्रे परिधान करून अकिहितो यांनी राजमहालातील अनेक पवित्र स्थळांना भेट देऊ न आपण राज्यत्याग करीत असल्याचे पूर्वजांना, तसेच परमेश्वरालाही कळविले. वृद्धापकाळ व नाजूक प्रकृतीमुळे आपण राष्ट्रप्रमुखाची कर्तव्ये पूर्ण क्षमतेने बजावू शकणार नाही, असे कारण देऊन त्यांनी राज्यत्याग केला. जपानच्या राज्यघटनेत सम्राटांच्या स्वेच्छेने राज्यत्यागाची तरतूद नसल्याने संसदेस राज्यघटनेत दुरुस्ती करून तशी सोय करावी लागली.