भारतीय संस्कृतीचं कौतुक वाटून जपानी जोडप्यानं केलं हिंदू पध्दतीनं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 02:07 PM2018-01-04T14:07:11+5:302018-01-04T14:43:39+5:30
जपानी जोडप्याने भारतात येऊन केलेल्या या हिंदु पध्दतीतील विवाहामुळे ते चर्चेचा विषय बनले आहेत
मदुराई : तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगविषयी आजवर ऐकलं असेल. पण डेस्टिनेश वेडिंगसोबतच तिकडच्या संस्कृतीनुसार कोणी लग्न केलेलं तुम्ही ऐकलं आहे? जपानच्या एका जोडप्यानं चक्क हिंदू पद्धतीने तामिळनाडूमध्ये लग्न केलंय. भारतीय लग्नपद्धतीवर प्रभावित होत या जोडप्याने अशाप्रकारे लग्न केलंय. त्यासाठी ते खास टोकियोमधून मदुराईला आले होते.
दि हिंदु या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चिहारू आणि युटो निआंगा असं या नवजोडप्याचं नाव आहे. २०१४ साली चिहारू ही तामिळनाडूमध्ये भाषेवर संशोधन करण्यासाठी आली होती. तिला तामिळनाडू आणि जपानी भाषेत काय साम्य आहे यावर संशोधन करायचं होतं. या संशोधनादरम्यान तिने तामिळनाडूमधील संस्कृती जाणून घेतली. तेव्हा तिनं इकडची लग्नाची पद्धतही शिकून घेतली. त्यामुळे ती या पद्धतीवर चांगलीच प्रभावित झाली होती. खरंतर या जोडप्याचं लग्न १ एप्रिल २०१७ साली जपानमध्ये झालं होतं. पण भारतीय पद्धतीला प्रभावित होऊन त्यांनी पुन्हा लग्न करायचं ठरवलं. या लग्नाला त्यांचे काहीच पाहुणे उपस्थित होते. तसंच, तामिळमधल्या त्यांच्या काही परिचितांनी हा विवाह संपन्न होण्यासाठी फार मदतही केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चिहारूला अस्खलित तामिळ भाषा बोलता येते. त्यांच्या लग्नासाठी तामिळ पद्धतीने छान मंडप घालण्यात आला होता. व्यासपीठावर फुलांची आरास केली होती. वधूने खास भरजरी कपडे, दागिने घातले होते. त्यांनी अग्नीच्या साक्षीने एकमेंकासोबत सप्तपदीही केली. एवढंच नव्हे तर त्यांच्या संस्कृतीत असलेली काशियात्रा ही एक प्रथाही त्यांनी पार पडली. चिराहूचं कन्यादानही तिच्या वडिलांनी केलं.
जपानमध्ये चर्चमध्ये लग्न करण्याची पध्दत आहे. त्यामुळे त्यां दोघांसाठी ही पद्धत फार वेगळी वाटली. म्हणूनच आपलंही अशाच पद्धतीने लग्न व्हावं याकरता त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातला. चिराहूच्या नवऱ्यालाही ही पद्धत फार भावली म्हणूनच त्याच्या घरच्यांनीही या पद्धतीला होकार दिला. खास लग्नासाठी ते टोकियोवरून मदुराईमध्ये आले होते. भारतीय लग्न पद्धत प्रत्येकालाच आवडते. यात जरा जास्त खर्च होत असला तरीही लग्नांच्या विधीमधून वधु-वरांवर अनेक प्रकारच्या विधी आणि संस्कार केल्या जातात. त्यामुळे आधीही अनेक परदेशी पर्यटकांनी भारतीय पद्धतीच्या लग्नाचं कौतुक केलंय.