अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. याच दरम्यान ट्रम्प यांनी भारतावर टीका केली आहे. "भारत हा विषारी हवा सोडणारा देश आहे" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावरून बायडन यांनी ट्रम्प यांना सुनावलं आहे.
ट्रम्प यांनी भारतातबाबत केलेल्या विधानावर ज्यो बायडन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बायडन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "राष्ट्रपती ट्रम्प यांनी भारताला घाणेरडं म्हटलं आहे. मित्रांविषयी कसं बोलायला हवं, हे पण माहिती नाही आणि जागतिक स्तरावरील हवामान बदलाच्या आव्हानांना कसं सोडवायला हवं. आपण आणि सहकारी कमला हॅरिस आम्ही दोघंही भारत अमेरिका यांच्यातील मैत्रीला महत्त्व देतो" असं बायडन यांनी म्हटलं आहे.
"भारत विषारी हवा सोडणारा देश", डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकास्त्र
ट्रम्प यांनी अध्यक्षीय वादविवादात पर्यावरण बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर आपल्या धोरणांचा बचाव करण्यासाठी भारत, चीन आणि रशियावर निशाणा साधला होता. 'अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करतो. त्या उलट चीन, भारत आणि रशिया आपल्या देशातील हवेच्या स्तराचा विचार करत नाही. या तीन देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे' असं म्हणत हे देश प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदलाबाबत घेतलेल्या भूमिकेवर यापूर्वीही टीका करण्यात आली आहे.
US Election : "निवडून आलो तर अमेरिकावासीयांना देणार मोफत कोरोनाची लस"
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जाहीरनाम्यात जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. असंच आश्वासन आता अमेरिकेत देखील देण्यात आलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी आपण निवडून आलो तर कोरोनाची लस मोफत देण्यात येईल असं म्हटलं आहे. कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी ही एक राष्ट्रीय योजना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक असून मृतांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोना पुढे हतबल झाला आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून बायडन यांनी ट्रम्प प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे.
'अमेरिकेत कोरोना व्हायरसचा सामना करण्यात ट्रम्प प्रशासन अपयशी ठरलं आहे. कोरोनाच्या या लढ्यात त्यांनी आत्मसमर्पण केलं आहे, हार पत्करली आहे' असं ज्यो बायडन यांनी म्हटलं आहे. जेव्हा कोरोना व्हायरसवरील सुरक्षित लस येईल तेव्हा अमेरिकेतल्या प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यात येईल. जर एखाद्या व्यक्तीचा विमा नसेल त्याला ही लस मोफत देण्यात येणार असल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे. जर मी निवडणूक जिंकलो तर कोरोनासोबत लढण्यावर सगळे लक्ष केंद्रित करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.