न्यूयाॅर्क : प्रसिद्ध अँटीव्हायरस साॅफ्टवेअर ‘मॅकॅफी’चे जनक जाॅन मॅकॅफी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. स्पेनमधील तुरुंगात त्यांचा मृतदेह आढळून आला. स्पेनच्या न्यायालयाने त्यांच्या अमेरिकेकडे प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्यानंतर काही वेळातच मृतदेह आढळल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली.
मॅकॅफी यांनी २०१४ ते २०१८ या कालावधीत कर चुकविल्याचा त्यांच्यावर आराेप हाेता. इस्तंबूलला विमानाने जात असताना बार्सिलाेना विमानतळावर ऑक्टाेबर २०२० मध्ये त्यांना स्पॅनिश पाेलिसांनी अटक केली हाेती. अमेरिकेने त्यांना फरार घाेषित केले हाेते. अमेरिकेने नाेव्हेंबर २०२० मध्ये स्पेनकडे प्रत्यार्पणासाठी विनंती केली हाेती. त्यात मॅकॅफी यांनी चार वर्षांमध्ये १० दशलक्ष युराेज एवढी कमाई केली असून, त्यावर प्राप्तिकर भरलेला नसल्याचा उल्लेख करण्यात आला हाेता. स्पेनमधील न्यायालयाने ही विनंती मान्य करून प्रत्यार्पणाची परवानगी दिली हाेती. मात्र, त्यानंतर काही वेळातच गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय तुरुंग प्रशासनाने व्यक्त केला आहे.
७५ वर्षीय जाॅन मॅकॅफी यांनी १९८७ मध्ये ‘मॅकॅफी कॉर्पाेरेशन’ ही कंपनी स्थापन केली हाेती. या कंपनीची संगणकांना संरक्षण देणाऱ्या अँटीव्हायरस क्षेत्रात अनेक वर्षे मक्तेदारी हाेती. त्यानंतर इंटेल कॉर्पाेरेशनने २०१० मध्ये त्यांची कंपनी विकत घेतली हाेती. ‘मॅकॅफी’ हे अँटीव्हायरस लाँच करण्यापूर्वी त्यांनी नासा, झेराॅक्स, लाॅकहीड मार्टीन यासारख्या संस्थांमध्ये काम केले हाेते.