पत्रकार महिला बनली इसिसच्या दहशतवाद्याची प्रेयसी

By admin | Published: March 10, 2015 05:45 PM2015-03-10T17:45:56+5:302015-03-10T18:00:22+5:30

सुशिक्षित घरातील अल्पवयीन मुली इसिसच्या जाळ्यात कशा अडकतात याचा शोध घेण्यासाठी फ्रान्समधील एका महिला पत्रकाराने थेट इसिसच्या दहशतवाद्याची प्रेयसी होण्याचा धोका पत्कारला.

Journalist woman became a terrorist actress | पत्रकार महिला बनली इसिसच्या दहशतवाद्याची प्रेयसी

पत्रकार महिला बनली इसिसच्या दहशतवाद्याची प्रेयसी

Next
>ऑनलाइन लोकमत 
पॅरिस, दि. १० - सुशिक्षित घरातील अल्पवयीन मुली इसिसच्या जाळ्यात कशा अडकतात याचा शोध घेण्यासाठी फ्रान्समधील एका महिला पत्रकाराने थेट इसिसच्या दहशतवाद्याची प्रेयसी होण्याचा धोका पत्कारला. इसिसच्या जाळ्यातून ती महिला सुखरुपरित्या बाहेर आली असली तरी इसिस समर्थकांकडून तिला जीवे ठार मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. 
फ्रान्समध्ये राहणा-या इरिल यांनी दोन वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये मुस्लीम तरुणांना कसे कट्टरतावादी बनवले जाते यावर लेखमाला प्रकाशित केले होते. मुस्लीम मुलांसोबत मुस्लीम मुलीही कट्टरतावादी संघटनांकडे वळत असल्याचे इरिल यांच्या लक्षात आले. अल्पवयीन मुलींना कसे फसवले जाते याचा अभ्यास करण्यासाठी इरिल यांनी एक धाडसी निर्णय घेतला.
 
इरिल बनली अल्पवयीन मुस्लीम तरुणी
इरिल यांनी गेल्या वर्षी मुस्लीम मुलीच्या नावाने फेसबुक व ट्विटरवर अकाऊंट उघडले. इरिल यांचे वय ३२ वर्ष असले तरी सोशल मिडीयावर त्यांचे १६ वर्ष ऐवढेच दाखवले. यानंतर त्यांनी इसिस समर्थकांच्या पेजेस व अकाऊंटवर सक्रीय सहभाग दर्शवला. इसिस समर्थकांची मानसिकता जाणून घेणे हा इरिल यांचा उद्देश होता. या नादात इरिल यांनी इसिसचा कमांडर अबू बिलेलचे लक्ष वेधले. अबू बिलेलला इरिल आवडली होती व त्याने ऑनलाइनच तिच्याशी संपर्क साधला. इरिल यांनी मुद्दामून अबू बिलेलला प्रतिसाद दिला. इराक व सिरीयातील नरसंहारात सहभागी असलेला अबू बिलेल इरिलशी अतिशय प्रेमाने वागत होता.  
काही दिवसाच्या संवादानंतर अबू बिलेलने इरिलला लग्नाची मागणी घातली व लग्नासाठी तिला सिरीयात यायचा आग्रह केला. तू इथे ये मी तुला राणीसारखे ठेवीन असे तो इरिलला सांगत होता. जिहादसाठी इराक व सिरीयात कशी लढाई केली, सिरीयाच्या सैन्यातील जवानांचा शिरच्छेद कसा केला याचे किस्सेही तो इरिलला सांगत होता. इरिलने अबू बिलेलचा विश्वास संपादन करण्यासाठी सिरीयात जायची तयारी दर्शवली. माझ्यासोबत १५ वर्षाची आणखी एक मुलगी सिरीयात येईल असा बनावही त्यांनी रचला होता. 
 
फ्रान्स ते सिरीया व्हाया अॅमस्टरडॅम
फ्रान्सवरुन सिरीयात येण्यासाठी अबू बिलेलने इरिल यांना अॅमस्टरडॅम - इस्तानबूल मार्ग सुचवला. फ्रान्समधील सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी फ्रान्समधील अॅमस्टरडॅम तिथून इस्तानबूल आणि मग तिथून सिरीया असा हा मार्ग होता. अॅमस्टरडॅमला गेल्यावर इरिल यांना जुना मोबाईल क्रमांक व फोन बदलून नवीन मोबाईल फोन व सिम कार्ड घ्यायला सांगितले. इरिल यांनी नवीन सिमकार्डवरुन अबू बिलेलला फोन केला. अबू बिलेलने इरिल यांना इस्तानबूलमध्ये एक महिला तुम्हाला विमानतळावर भेटेल असे इरिलला सांगितले. मात्र यानंतर इरिल घाबरल्या व त्यांनी इस्तानबुलमध्ये जाण्यास नकार दिला. यानंतर अबू बिलेलने इरिलला शिवीगाळ केली. इरिल या सुखरुप फ्रान्समध्ये परतल्या असल्या तरी त्यांच्या बनावट अकाऊंटवर आता इसिस समर्थकांकडून धमक्या येत आहे. इरिल यांचे छायाचित्र शेअर होत असून ही मुलगी दिसताच तिला ठार मारा असे पोस्ट सर्वत्र शेअर होत आहेत. 
 
इरिलला कडेकोट सुरक्षा बंदोबस्त 
इसिसच्या रडारवर आल्याने व चार्ली हेब्दोवरील हल्ल्याने इरिलचे जीवनच बदलून गेले. त्यांना फ्रान्स पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. इरिल यांच्याकडे दुर्मिळ प्रजातीतील पाळीव श्वान होते. पोलिसांनी हे श्वानही इरिल यांच्यापासून दुर केले. या श्वानावरुन इरिल यांना ओळखणे सोपे जाईल यामुळे पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. 

Web Title: Journalist woman became a terrorist actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.