संयुक्त राष्ट्र संघ : संयुक्त राष्ट्र संघाच्या नेदरलँड््समधील दि हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयावरील न्यायाधीशपदासाठी भारताने तेथील विद्यमान न्यायाधीश न्या. दलवीर भंडारी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. ६९ वर्षांच्या न्या. भंडारी यांची सध्याची मुदत फेब्रुवारीपर्यंत आहे. पुन्हा निवड झाल्यास ते आणखी नऊ वर्षे न्यायाधीश राहतील.हेग न्यायालयावरील १५ न्यायाधीशांची निवड येत्या नोव्हेंबरमध्ये व्हायची आहे. त्यासाठी भारताने न्या. भंडारी यांचे नामनिर्देशन सोमवारी संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अॅन्तोनिओ ग्युटर्स यांच्याकडे सादर केले. हेग येथे येण्यापूर्वी न्या. भंडारी भारतात उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे २० वर्षे न्यायाधीश होते.न्यायाधीश निवडीसाठी संयुक्त राष्ट्रांची आमसभा आणि सुरक्षा परिषद या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी परंतु स्वतंत्रपणे मतदान होते. निवडून येण्यासाठी संबंधित न्यायाधीशास दोन्ही ठिकाणी स्पष्ट बहुमताची मते मिळावी लागतात. न्यायाधीशांची निवड राष्ट्रीयत्वाच्या आधारे होत नाही. पण एकाच देशाचे दोन न्यायाधीश एकाच वेळी न्यायालयावर असणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. (वृत्तसंस्था)
हेग कोर्टासाठी पुन्हा न्या. भंडारी
By admin | Published: June 21, 2017 1:32 AM