ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 16 - हेरगिरीच्या कथित आरोपाखाली पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचे भवितव्य आता पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या हातात आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीच्या शिक्षेविरोधातील अपील फेटाळल्यानंतर जाधव यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याकडे दया याचिका दाखल केली होती. मात्र जाधव यांच्या फाशीबाबतचा निर्णय मेरिटवरच घेतला जाईल, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जाधव यांचे भविष्य पुन्हा एकदा संकटात सापडले आहे.
कुलभूषण जाधव यांना भारताचे गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून पाकिस्तानच्या सैनिकी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतल्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस स्थगिती दिली होती.
हेरगिरी, विघातक कारवाया आणि दहशतवादी कृत्ये केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कमांडर कुलभूषण सुधीर जाधव यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता.
अधिक वाचा
(कुलभूषण जाधव यांनी केला दयेसाठी अर्ज )(कुलभूषण जाधव यांच्या आईला पाक देणार व्हिसा? )(कुलभूषण जाधव प्रकरण ICJ मध्ये नेणं भारताची सर्वात मोठी चूक- काटजू )पाकिस्तानच्या लष्करी जनसंपर्क विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका निवेदनात ही माहिती देताना लष्करी अपिली न्यायालयाकडे केलेले अपील फेटाळल्यानंतर जाधव यांनी लष्करप्रमुखांकडे हा दयेचा अर्ज केला आहे. यानंतर कायद्यानुसार त्यांना पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांकडे दयेचा अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे सांगितले होते.
जाधव यांनी या दयेच्या अर्जात आपण हेरगिरी व विघातक आणि दहतवादी कारवाया केल्याची कबुली देऊन त्यामुळे मोठया प्रमाणावर झालेल्या जीवितवित्तहानीबद्दल पश्चात्ताप व्यक्त करत लष्करप्रमुखांना दयाबुद्धीने आपले प्राण वाचविण्याची विनंती केली आहे, असा दावा या निवेदनात करण्यात आला.