Karachi University Blast:M.Phil,दोन मुलांची आई आणि डॉक्टरची पत्नी; कोण होती आत्मघाती हल्ला करणारी 'ती' महिला?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 12:16 PM2022-04-27T12:16:32+5:302022-04-27T12:16:44+5:30
Karachi University Blast: पाकिस्तानातील कराची विद्यापीठात एका महिला सुसाइड बॉम्बरने चीनी ताफ्यावर हल्ला केला, ज्यात तीन चीनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Karachi University Blast: पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात आत्मघाती स्फोट घवणाऱ्या महिलेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्फोटात 3 चिनी नागरिकांसह 4 जणांचा मृत्यू झाला असून, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने(BLA) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. स्फोटापूर्वीचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये बुरखा घातलेली एक महिला दिसत आहे.
उच्चशिक्षीत कुटुंबातील महिला
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कराची विद्यापीठातील चायनीज सेंटरजवळ स्वत:ला उडवणारी महिला उच्चशिक्षीत असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेने MSc झूलॉजीचे शिक्षण घेतले असून, सध्या ती M.Phil करत होती. तसेच, तिचा नवराही पेशाने डॉक्टर आहे. या महिलेला 8 आणि 4 वर्षांची दोन मुलेही आहेत.
बलुचची पहिली महिला फिदायन हल्लेखोर
बीएलएने दिलेल्या माहितीनुसार, महिलेला दोन लहान मुले असल्यामुळे तिला बीएलए सोडण्याचा पर्यायदेखील देण्यात आला होता. परंतु तिने नकार दिला आणि बलुचिस्तान-पाकिस्तानच्या हितासाठी चिनी लोकांना लक्ष्य करण्याचे म्हटले होते. बीएलने 30 वर्षीय शारी बलोचचे वर्णन बलुचची पहिली महिला फिदायन हल्लेखोर म्हणून केले आहे.
चीनला इशारा
बलुच लिबरेशन आर्मीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात चीनला इशारा दिला आहे. त्यांनी पाकिस्तानात सुरू असलेले त्यांचे 'शोषण' प्रकल्प तात्काळ थांबवावेत आणि पाकिस्तानवर कब्जा करण्याचा विचार करू नये, अन्यथा आणखी हल्ले होतील, असे म्हटले आहे. बलुच लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेडचे शेकडो उच्च प्रशिक्षित स्त्री-पुरुष असे हल्ले करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे.