काश्मीरचे स्वातंत्र्य हेच लक्ष्य, हाफिज सईदची दर्पोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 04:44 AM2017-11-25T04:44:00+5:302017-11-25T07:20:24+5:30
लाहोर : पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या जमात-उद-दावाचा प्रमुख आणि २००८च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याची शुक्रवारी नजरकैदेतून सुटका करण्यात आली.
लाहोर : पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या जमात-उद-दावाचा प्रमुख आणि २००८च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याची शुक्रवारी नजरकैदेतून सुटका करण्यात आली. काश्मीर प्रश्नावरून देशातील लोकांची एकजूट करणार असल्याचे हाफिज सईद याने सुटकेनंतर सांगितले. सुटकेनंतर काश्मीरचे स्वातंत्र्य हेच आपले लक्ष्य आहे, असे सांगताना त्याने भारताविरुद्धही विधाने केली.
सईदची सुटका म्हणजे २६ नोव्हेंबरच्या मुंबई अतिरेकी हल्ल्यातील आरोपींना न्यायाच्या चौकटीत आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांना धक्का असल्याचे मानले जात आहे. अतिरेकी कारवायांत सहभाग असल्याच्या कारणावरून हाफिज सईदवर अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस घोषित केलेले आहे. हाफिज सईद हा या वर्षी जानेवारीपासून २९७ दिवस नजरकैदेत होता.