खैबर पख्तुनख्वा - पाकिस्तानात जमावानं एका हिंदूमंदिराची तोडफोड केली आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाटमधील करक जिल्ह्यात ही घटना घडली. मंदिराच्या विस्तार कार्याला विरोध करण्यासाठी आलेल्या जमावानं मंदिराच्या जुन्या ढाच्यासह नवं बांधकामदेखील जमीनदोस्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिकारी इरफान मरवत यांनी दिली. तोडफोड करण्यात आलेलं हिंदू मंदिर सरकार पुन्हा बांधून देईल अशी घोषणा पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी केली आहे.
मंदिरावरील हल्ला आणि तोडफोड दुर्दैवी असल्याचं खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी म्हटलं. त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला असून दोषींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचं हिंदू समुदायाचे नेते पेशावर हारून सरबयाल यांनी म्हटलं. देशभरातील हिंदू कुटुंबं दर गुरुवारी मंदिराला भेटी द्यायचे. त्या ठिकाणी एका धार्मिक हिंदू नेत्याची समाधी आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले. या प्रांतातील अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यास सरकार कटिबद्ध असून हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मुख्यमंत्री खान यांनी दिली.
मंदिराची तोडफोड केल्या प्रकरणी 45 लोकांना अटक करण्यात आले असून यामधील अधिक लोक हे कट्टरतावादी इस्लामिक पक्षाचे असल्याचं म्हटलं जात आहे. अटक केलेल्यांमध्ये जामियात उलेमा-ए-इस्लामचे नेते रहमत सलाम खट्टक यांचाही समावेश आहे. तोडण्यात आलेले हे हिंदू मंदिर पुन्हा बांधून देण्यात यावे असे आदेश प्रांतीय सरकारने दिल्याची माहिती मुख्यमंत्री खान यांचे विशेष सहाय्यक (माहिती) आणि सरकारचे प्रवक्ते कामरान बंगश यांनी दिली. मंदिर बांधण्याचे आदेश दिल्याचे बंगश यांनी सांगितलं आहे.
पाकिस्तानच्या लोकसंख्येचा विचार केला गेल्यास हिंदू सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानातल्या हिंदूंची संख्या 75 लाख इतकी आहे. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड होत असते. गेल्या महिन्यात सिंध प्रांतात कट्टरवाद्यांनी एका मंदिराचं नुकसान केलं. जुन्या कराचीतल्या शीतलदास कंपाऊंड परिसरात ही घटना घडली. तोडफोड करण्यात आलेल्या प्राचीन मंदिराजवळ जवळपास 300 हिंदू कुटुंब वास्तव्यास आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.