किम वेडा माणूस, कधीही विसरणार नाही अशी अद्दल घडवू! डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 06:17 PM2017-09-22T18:17:57+5:302017-09-22T18:22:22+5:30
उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिकेने अत्यंत कठोर शब्दात निर्वाणीचा इशारा दिला आहे.
वॉशिंग्टन - उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिकेने अत्यंत कठोर शब्दात निर्वाणीचा इशारा दिला आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन एक वेडा माणूस आहे. आपल्या देशातील लोक उपाशी मरतील याची त्याला अजिबात चिंता वाटत नाही. त्यांची हत्या करायलाही तो मागेपुढे पाहत नाही. आम्ही किम जोंग आणि उत्तर कोरियाला कधीही विसरणार नाहीत असा धडा शिकवू असा इशाराच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करुन दिला आहे.
Kim Jong Un of North Korea, who is obviously a madman who doesn't mind starving or killing his people, will be tested like never before!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) September 22, 2017
उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री याँग हो यांनी शुक्रवारी अमेरिकेने आमच्याविरोधात लष्करी कारवाई केली, तर आमचा सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब प्रशांत महासागरात टाकू', अशी धमकी दिली. त्यावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले. सध्या दोन्ही देशांमध्ये शाब्दीक लढाई जुंपली आहे. परस्परांना इशारे, धमक्या दिल्या जात आहेत. उत्तर कोरियाला ताळयावर आणण्यासाठी अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून निर्बंध आणले आहेत. पण तरीही किंम जोग उन कोणाचेही ऐकायला तयार नाही.
संयुक्त राष्ट्राचे निर्बंध धुडकावून त्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या सुरुच आहेत. आठवडयाच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी कोरियाच्या आकाशात जोरदार युद्ध सराव केला. उत्तर कोरियाने शक्तीशाली हायड्रोजन बॉम्ब पाठोपाठ क्षेपणास्त्र चाचणी केल्यामुळे कोरियन द्विपकल्पात युद्धाचे ढग जमा झाले आहेत. अमेरिकेची चार F-35B स्टेलथ फायटर जेट आणि दोन B-1B बॉम्बर विमाने सरावात सहभागी झाली होती.
मागच्या शुक्रवारी उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले. त्यावेळी अमेरिकेने आपल्या ताफ्यातील अत्याधुनिक लढाऊ विमानाद्वारे उत्तर कोरियाला हवाई ताकद दाखवून दिली. उत्तर कोरियावर जरब बसवणे हा उड्डाणामागे हेतू होता. अमेरिकन आणि दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांचे एकत्रित उड्डाण हा नियमित सरावाचा भाग होता. संयुक्त कारवाईची क्षमता वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या कवायती यापुढेही सुरु राहतील असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
दक्षिण कोरियाची चार F-15K फायटर जेट विमाने या सरावात सहभागी झाली होती. यापूर्वी 31 ऑगस्टला अशा प्रकारचा युद्ध सराव करण्यात आला होता. उत्तर कोरियानवे बेजबाबदारपणे जी शस्त्रास्त्रांची स्पर्धा चालवली आहे ती तात्काळ बंद करावी अन्यथा उत्तर कोरियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा वारंवार अमेरिकेकडून इशारा देण्यात येत आहे. तरीही उत्तर कोरियाच्या वर्तनात काहीही फरक पडलेला नाही.