उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) हा त्याच्या क्रूरतेसाठी लोकप्रिय आहे. त्याचा क्रूर चेहरा हा सातत्याने जगासमोर येत असतो. त्याच्या अजब कायद्यांची नेहमीच चर्चा होत असते. किम जोंग उन याने आता के-पॉप प्रेमींना जाहीर धमकी दिली आहे. प्रशासनाने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पॉप गाणी ऐकणाऱ्यांना थेट 15 वर्षे श्रमिक शिबिरात (लेबर कॅम्प) काम करावे लागणार आहे. के-पॉप संगीत एखाद्या कॅन्सरसारखं असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियात कोरियन पॉप गाण्यांना के-पॉप म्हटलं जातं. मुख्यत: पाश्चिमात्य संगीतावर आधारीत असलेल्या के-पॉपमध्ये नृत्य आणि संगीतात नवीन ट्रेंड रुजत आहेत. त्यामुळे के-पॉपची लोकप्रियता जगभरात वाढत आहे.
दक्षिण कोरियाचे टीव्ही शो, चित्रपटांनाही लोकप्रियता लाभत आहे. उत्तर कोरियामध्येही याची लोकप्रियता वाढत आहे. दक्षिण कोरियाच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेता उत्तर कोरिया सरकार सतर्क झाले आहे. उत्तर कोरियामध्ये मनोरंजनाची साधने ही मर्यादित स्वरुपात आहेत. माध्यमे आणि इंटरनेटवर सेन्सॉरशिप लागू करण्यात आली आहे. त्यामुळेच अनेकजण दक्षिण कोरियातून बेकायदेशीरपणे मनोरंजनासाठी तेथील संगीत, चित्रपटांच्या सीडी, डीव्हीडी मागवतात. सीमेवर तपासणी कठोर केल्यानंतर तस्करीचा मार्गही बदलण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी नुकतीच या प्रकारावर कठोर टीका केली आहे.
दक्षिण कोरियाई चित्रपट, नाटक आणि के-पॉप संगीताच्या माध्यमातून उत्तर कोरियातील समाजवादाविरोधात आणि सरकारविरोधात लोकांना चिथावणी देत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच आता किम जोंग उन यांच्या सरकारने सांस्कृतिक आक्रमण रोखण्यासाठी नवीन आदेश जारी केले आहेत. दक्षिण कोरियाचे संगीत, टीव्ही मालिका उत्तर कोरियातील भाषा, व्यवहार भ्रष्ट करत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटले. डिसेंबर महिन्यातच याबाबतचा एक कायदा तयार करण्यात आला होता. यामध्ये दक्षिण कोरियातील कोणत्याही मनोरंजन विषयक साहित्याचा आस्वाद घेतल्यास 15 वर्ष श्रमिक छावणीत कैद व्हावे लागणार आहे. याआधी ही शिक्षा फक्त पाच वर्षे होती. तर, पेन ड्राइव्हची तस्करी करणाऱ्या दोषींना मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
...तर उत्तर कोरियातील नागरिकांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा!
उत्तर कोरियाचा सनकी हुकूमशहा किम जोंग उन यांने नुकताच एक नवा कायदा आणला आहे. या कायद्यात, उत्तर कोरियातील परदेशी प्रभाव संपवण्यासाठी परदेशी चित्रपट, कपडे आणि अयोग्य भाषेचा वापर केल्यास मृत्यूदंडापासून ते कारागृहापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी, किम जोंग उनने एका व्यक्तीला, तो केवळ दक्षिण कोरियन चित्रपटासह पकडला गेला म्हणून मृत्यूदंड दिला होता. यून मि सो त्यावेळी 11 वर्षांची होती तेव्हा उत्तर कोरियन व्यक्तीला मृत्यूदंड देण्यात आला होता. त्यावेळी, त्याच्या शेजाऱ्यांनाही या मृत्यूदंडाची संपूर्ण प्रक्रिया पाहण्याचा आदेश देण्यात आला होता. सो ने बीबीसी सोबत बोलताना सांगितले, की जर तुम्ही ही मृत्यूदंडाची शिक्षा पाहिली नाही, तर तो राजद्रोह मानला जाईल. एवढेच नाही, तर अश्लिल व्हिडिओची तस्करी करून आणण्याची शिक्षा मृत्यूदंडही असू शकते, असेही उत्तर कोरियाचे सैनिक स्पष्ट करत होते.