बर्न (स्वित्झर्लंड): गरिबांचे मसिहा म्हणून ओळखले जाणारे संयुक्त राष्ट्र संघाचे माजी सरचिटणीस आणि नोबेल पुरस्कार विजेते कोफी अन्नान यांचं आज वयाच्या ८० व्या वर्षी निधन झालं.
८ एप्रिल १९३८ रोजी त्यांचा घाना या देशात त्यांचा जन्म झाला होता. संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसपदाची धुरा सांभाळणारे ते आफ्रिकन वंशाचे पहिले नागरिक होते. १९९७ आणि २००६ मध्ये सलग दोन वेळा त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचं सरचिटणीसपद भूषवलं होतं. जागतिक शांतता आणि गरिबी हटाव ही त्यांच्या आयुष्याची ध्येय होती आणि त्यासाठीच ते कायम झटले. युद्धात होरपळलेल्या जनतेचं पुनर्वसन करण्याचं कामही त्यांनी केलं होतं. या योगदानासाठीच २००१ मध्ये त्यांना शांततेचं नोबेल प्रदान करण्यात आलं होतं.
'कोफी अन्नान फाऊंडेशन'चे संस्थापक अध्यक्ष आणि नेल्सन मंडेला यांनी स्थापन केलेल्या 'द एल्डर' या आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक्सची संकल्पना त्यांना आवडली होती आणि पुढच्या महिन्यात - ६ सप्टेंबरला ते ही क्लिनिक पाहण्यासाठी भारतात येणार होते. परंतु, हा दौरा होऊ शकला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोफी अन्नान यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी झटणारा नेता गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.