राजेश पिल्लेवार, वृत्तसंपादककल्पना करा की लुसलुशीत फोमच्या आरामदायी खुर्चीवर आकाशाकडे डोळे करून तुम्ही ऐसपैस पहुडले आहात. आसपास असेच शेकडो लोक आहेत. तुमच्या आजूबाजूला चारही बाजूंनी ३६० अंशाच्या कोनात अजस्र स्क्रिन्सचा डोळे दीपवणारा लखलखाट सुरू आहे. स्क्रिनवर भारत-पाकिस्तान क्रिकेटचा अंतिम सामना सुरू आहे. जिंकण्यासाठी आपल्याला शेवटच्या चेंडूवर षटकार हवा आहे. क्रीजवर रोहित शर्मा आहे. तो चेंडू हवेत उंच फटकावतो आणि आपण जिंकतो. क्षणात सारे सभागृहातील तसेच स्क्रीनवरील आवाजाने न्हाऊन निघतात. त्या अवर्णनीय आनंदात तुमचे चित्त तृप्त होते... वर्णन करताना शब्द कदाचित कमी पडावेत, असा हा अनुभव... हा अनुभव इतका जिवंत होऊन आपल्यापुढे येतो की आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असल्यासारखे वाटते.
हा अनुभव आलाय अमेरिकेतील लास वेगास शहरात. कॅसिनो, जगातील सर्व ब्रँड्सची खरेदी आणि खानपान अशा सर्व प्रकारच्या ऐशोरामासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात एक आगळेवेगळी इमारत आकाराला आली आहे. शहरातील द व्हेनेशियन रिसॉर्ट येथे बांधलेल्या या इमारतीचे ४ जुलै २०२३ रोजी लोकार्पण करण्यात आले. ‘द लास वेगास स्फीअर’ असं या इमारतीचं नाव. नावाप्रमाणेच ती स्फीअर म्हणजेच जवळपास संपूर्ण गोल आकाराची आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य बेल्जियम या देशातून मागवण्यात आले. स्टँडवर ठेवलेला माठ जसा दिसेल, तसे त्याचे स्वरूप आहे. माठाला जसे वर झाकण असते, तसा या इमारतीला एक वरचा कप्पा देण्यात आला आहे. त्या तेवढ्या कप्प्याचेच वजन दोन बोईंग ७५० विमानांच्या वजनाइतके आहे. आता बोला!
द लास वेगास स्फीअर असा... -५६,००० मीटर एकूण क्षेत्र१११.५ मीटर (३६६ फूट) उंची१५० मीटर (४९२ फूट) व्यास२३० कोटी डॉलर्स एकूण खर्च१८,६०० प्रेक्षक क्षमता२०,००० प्रेक्षक उभे राहू शकतात१५,००० वर्गमीटर आतील स्क्रीन१,६०,००० स्पीकर्स२०१८ साली बांधकाम सुरू२०२३ मध्ये लोकार्पण
वैशिष्ट्ये...- जगातील हे सर्वात मोठे गोलाकार स्ट्रक्चर (स्फीअर) आहे.- मोठ-मोठ्या स्पर्धा, इव्हेंटस्, प्रॉडक्ट लाँच इत्यादी कार्यक्रमांसाठी याचा उपयोग होईल.- या स्फीअरच्या बाहेरील आवरण जगातील सर्वात विशाल एलईडी स्क्रीन आहे.- उच्च दर्जाचा आणि विशाल व्हिडीओ प्रदर्शित करणारी ही जगातील एकमेवस्क्रीन आहे.- सभागृहात कुठेही बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला आवाज आणि स्क्रीनचा सारखाच अनुभव घेता येईल. - शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकाला पहिल्या रांगेत असल्याची सुखदअनुभूती होईल.- प्रेक्षकाला त्याच्या भाषेत कार्यक्रम ऐकता येईल.
यापूर्वी कोण होते नंबर वन?स्वीडनच्या ‘विचिए अरेना’ हे यापूर्वी जगातील सर्वांत मोठे गोलाकार स्ट्रक्चर होते. ते बांधण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागला. ८५ मीटर (२७९ फूट) इतकी आतील उंची आणि ११० मीटर (३६० फूट) व्यास अशी त्याची रचना होती.
गोलाकारच का?लास वेगास शहरात अनेक गगनचुंबी इमारती आहेत. कंपनीच्या मालकांना काहीतरी हटकेच हवे होते. त्यातून गोलाकार आकाराची कल्पना पुढे आली.