अफगाणिस्तानमध्ये भीषण आत्मघाती हल्ला, विद्यार्थ्यांसह १८ जणांचा मृत्यू, ५७ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 05:47 AM2020-10-25T05:47:07+5:302020-10-25T06:46:18+5:30
suicide attack in Afghanistan News : काबूलमध्ये शनिवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शालेय विद्यार्थ्यांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ५७ जण जखमी झाले.
काबूल (अफगाणिस्तान) - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये शनिवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शालेय विद्यार्थ्यांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ५७ जण जखमी झाले. गृहमंत्रालायाने सांगितले की, हा बॉम्बस्फोट पश्चिम काबूलच्या दस्त ए बारची येथील शिया बहूल भागात एका शैक्षणिक केंद्राबाहेर झाला. हल्लेखोर शिक्षण केंद्रात घुसण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखले, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते तारिक अरियान यांनी सांगितले.
दरम्यान, या हल्ल्यातील मृतांचा आकडा अजून वाढू शकतो, अशी भीती गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने वर्तवली आहे. पीडित कुटुंबांकडून रुग्णालयांमध्ये आपल्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. तर तालिबाननेसुद्धा या हल्ल्यात आपला हात असल्याचे नाकारले आहे. यापूर्वी इस्लामिक स्टेटशी संबंधित एका संघटनेने ऑगस्ट २०१८ मध्ये अशाच प्रकारे झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. त्या हल्ल्यात ३४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेटने अल्पसंख्याक शिया, शिख आणि हिंदूंवर मोठ्या हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. काबूलमध्ये इस्लामिक स्टेटचा निष्ठावंत असलेल्या एका बंदुकधाऱ्याने काबूलमध्ये धार्मिक स्थळावर हल्ला करून २५ जणांचा बळी घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात हिंदू आणि शि समुदायातील शेकडो व्यक्तींनी देशातून पलायन केले होते.
दरम्यान, या बॉम्बस्फोटापूर्वी शनिवारी पर्व अफगाणिस्तानमध्ये रस्त्याच्या कडेला झालेल्या बॉम्बस्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला होता. या स्फोटामध्ये एक मिनी व्हॅन सापडली होती. गझनी प्रांताच्या पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, दुसऱ्या स्फोटात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे पोलीस कर्मचारी आधी झालेल्या स्फोटातील जखमींच्या मदतीला जात होते.