तालिबानला झटका : अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी अमेरिकेनं अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्र, वाहनं जाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 09:59 PM2021-09-07T21:59:07+5:302021-09-07T22:03:45+5:30
Afghanistan Taliban Crisis : ईगल नावाचा सीआयएचा कँप काबुलच्या देह सब या ठिकाणी स्थित आहे. एनडीएस ०१ फोर्से या ठिकाणी करण्यात आली होती तैनात.
अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी अमेरिकनांनी कोट्यवधी डॉलर्सची शस्त्रे आणि वाहने नष्ट केली असल्याची माहिती आता समोर आली आहे. अफगाणिस्तानातील स्थानिक माध्यमांनी तालिबानच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सोमवारी तालिबाननं पत्रकारांना माजी सीआयए ऑपरेशनल सेंटरमध्ये प्रवेश दिला. अमेरिकन सैनिकांनी येथून बाहेर पडण्यापूर्वी सर्व लष्करी उपकरणं, वाहनं आणि कागदपत्रं जाळून टाकल्याचं तालिबाननं यावेळी त्यांना सांगितलं. टोलो न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.
'ईगल' नावाचे हे सीआयए कॅम्प काबूलच्या देह सब परिसरात आहे. अमेरिकन गुप्तचर अधिकारी आणि अफगाणचे NDS 01 फोर्सेस येथे तैनात होते. आता हा परिसर तालिबानच्या ताब्यात आहे. महत्त्वाची कागदपत्रे, शेकडो हम्वीज, लष्करी टॅक्स आणि शस्त्रं अमेरिकन सैन्यानं नष्ट केली असल्याचं टोलो न्यूजनं तालिबानच्या हवाल्यानं म्हटलं आहे. या ठिकाणी ज्याचा वापर करता येऊ शकला असता ते सर्वकाही नष्ट करण्यात आल्याची प्रतिक्रिया कँपचा कमांडर मौलवी अथनेन यानं दिली.
माईन्सच्या भीतीनं तालिबान खोल्यांपासून दूर
सध्याही तालिबाननं कॅम्पमधील अनेक खोल्यांमध्ये प्रवेश केलेला नाही. या ठिकाणी माईन्स असतील अशी भीती सध्या त्यांच्यात आहे. ३१ ऑगस्ट रोजी अमेरिकनं लष्करानं अफगाणिस्तान सोडलं. २० वर्षांपर्यंत सुरू असलेल्या मोठ्या युद्धानंतरही अमेरिकेचं लष्कर या ठिकाणाहून गेल्यानंतर अफगाणिस्तानची परिस्थिती हालाकीची झाली आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून ६ हजार अमेरिकन नागरिकांना बाहेर काढलं असल्याची माहिती अमेरिकेचे सुरक्षा सचिन लॉयड जे ऑस्टीन-३ यांनी दिली. तसंच आतापर्यंत बाहेर काढलेल्या एकूण नागरिकांची संख्या १,२४,००० असल्याचंही ते म्हणाले.