संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा नेता मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर फ्रान्स काम करीत आहे. पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या शक्तिमान सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद ग्रहण केल्यानंतर हा प्रस्ताव फ्रान्स निर्बंध समितीत मांडू शकेल.ही परिषद १५ सदस्यांची असून, दर महिन्याला तिचे अध्यक्षपद एकेका देशाकडे जाते. हे अध्यक्षपद एक्वाटोरियल ग्युनियाकडून एक मार्च रोजी फ्रान्सकडे जाईल. सुरक्षा परिषदेचा फ्रान्स हा स्थायी सदस्य असून, त्याला नकाराधिकार (व्हेटो) आहे. मसूद अझहर याच्यावर बंदी घातली जावी, अशा प्रस्तावावर फ्रान्स काम करीत असून, तो खूप लवकर तयार होईल, असे माहीतगार सूत्रांनी सांगितले.
फ्रान्सच्या अध्यक्षतेखालील निर्बंध समितीपुढे कदाचित हा प्रस्ताव मांडलाही जाईल. ‘मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्यात यावी, असा वैयक्तिक विनंतीचा प्रस्ताव निर्बंध समितीपुढे आणण्यावर फ्रान्सने लक्ष केंद्रित केले आहे,’ असे त्याने सांगितले. अझहरला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यात यावे, असे प्रयत्न संयुक्त राष्ट्रांत गेल्या १० वर्षांपासून सुरू असून, हा नियोजित प्रस्ताव मांडला गेल्यास तो चौथा असेल. २००९ मध्ये भारताने असाच प्रस्ताव मांडला होता. २०१६ मध्ये भारताने असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या १२६७ निर्बंध समितीपुढे अमेरिका, इंग्लड आणि फ्रान्स (पी ३) या देशांसह मांडला होता. २०१६ पठाणकोट येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याचा कटही मसूद अझहरनेच रचला होता.
२०१७ मध्ये पी देशांनी (अमेरिका, फ्रान्स, इंग्लड) हा प्रस्ताव पुन्हा मांडला होता. तथापि, त्या प्रत्येक वेळी चीनने या परिषदेचा स्थायी सदस्य या नात्याने त्याला मिळालेल्या नकाराधिकाराचा वापर करून, तो समितीत संमत होऊ दिला नाही.