‘अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्त होणारी पहिली महिला म्हणून माझा सन्मान होत असला तरी माझी खात्री आहे की, मी पहिली महिला उपाध्यक्ष असले तरी अखेरची नक्कीच नाही. तुम्ही कोठून आलात, तुम्ही कोणत्या वंशाचे आहात, तुमचा धर्म काय वगैरे गोष्टींना प्राधान्य न देता संधी उपलब्ध करून देणारा देश म्हणजे आमचा अमेरिका. त्यामुळे आज जी लहान मुले हा कार्यक्रम पाहत असतील त्यांनी मोठे होण्याची, या ठिकाणापर्यंत पोहोचण्याची स्वप्ने जरूर पाहावीत. त्याची पूर्तता करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. मी आज या ठिकाणी पोहोचले ते केवळ अमेरिकेतील लोकशाही मूल्यांमुळे आणि अर्थातच माझ्या आईच्या संस्कारांमुळे...’, अशा भावोत्कट शब्दांमध्ये नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी मनोगत व्यक्त केले.
बायडेन यांच्या निवडीची घोषणा होताच डेलावेअर येथे बायडेन आणि हॅरिस यांनी लोकांशी संवाद साधला त्यावेळी हॅरिस बोलत होत्या. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष ठरण्याबरोबरच पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई महिला उपाध्यक्ष म्हणूनही कमला हॅरिस यांची ओळख निर्माण झाली आहे. या सगळ्याचे श्रेय त्यांनी अमेरिकेच्या लोकशाही मूल्यांना दिले. जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो आम्ही सार्थ ठरवू. अमेरिकी जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन आम्ही काम करू, अशी ग्वाही हॅरिस यांनी यावेळी दिली, तसेच आपल्यावर विश्वास दाखविल्याबद्दल नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांचे आभारही हॅरिस यांनी मानले.
वयाच्या १९ व्या वर्षी माझी आई भारतातून येथे आली. त्यावेळी तिने या क्षणाची कल्पनाही केली नसेल. मात्र, तिचा अमेरिकेवर गाढा विश्वास होता आणि आज तिचे स्वप्न साकार झाले आहे. देश आणि स्थळ कुठलेही असो महिला कायमच सोसत आल्या आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्याचा माझा सतत प्रयत्न राहील, असेही हॅरिस म्हणाल्या.