नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पत्र लिहिले असून, भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यातील त्यांचे साहस व दृष्टिकोन यांची प्रशंसा केली आहे. लाखो लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर काढून भारताला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी मनमोहनसिंग यांनी केलेले प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत, असे ओबामा यांनी म्हटले आहे. ओबामा यांनी गेल्या आठवड्यात मनमोहनसिंग यांना फोन केला होता. दररोज कामकाज करत असताना, मनमोहनसिंग यांची उणीव निश्चितच जाणवेल, असे ओबामा यांनी म्हटले होते. सिंग यांनी पाठविलेल्या निरोपाच्या पत्राच्या उत्तरात ओबामा यांनी असे म्हटले आहे की, आपल्याशी फोनवर बोलणे अत्यंत आनंदाचे होते, आपण पाठविलेल्या विचारपूर्ण पत्राला उत्तर देण्याची माझी इच्छा होती. आपल्या पंतप्रधानपदाच्या दोन उत्कृष्ट कार्यकाळात आपण पार पाडलेल्या जबाबदारीबद्दल आपले कौतुक करावे तितके कमीच आहे. दहा वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत दोन्ही देशातील संरक्षण संबंध मजबूत केले, अणुव्यापारात सहभागी होणे, व्यापार वाढविणे व स्वच्छ ऊर्जा उद्योगातील आव्हाने स्वीकारली, भारत व अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी आपल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी मी अत्यंत आभारी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ओबामा यांचे मनमोहनसिंग यांना पत्र
By admin | Published: May 22, 2014 1:25 AM