Lockdown News: लॉकडाऊनचा प्रचंड फटका; अमेरिकेतील खाजगी क्षेत्रात २०.२ दशलक्ष रोजगार कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 12:42 AM2020-05-08T00:42:21+5:302020-05-08T07:08:49+5:30
महामंदीपेक्षाही अधिक नोकर कपात; आकडेवारी अजूनही अपूर्ण
वॉशिंग्टन : कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अमेरिकेतील खाजगी क्षेत्राने एप्रिलमध्ये तब्बल २0.२ दशलक्ष रोजगार कपात केली आहे. एका पेरोल डाटा कंपनीने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ऑटोमॅटिक डाटा प्रोसेसिंग’(एडीपी) अहवालात म्हटले आहे की, एप्रिलमध्ये अमेरिकेतील सेवादाता उद्योगाने १६,00७,000 लोकांना कामावरून कमी केले आहे. वस्तू उत्पादन क्षेत्राने ४,२२९,000 रोजगारांत कपात केली आहे. मोठ्या कंपन्यांनी ८,९६३,000 कामगारांना काढले आहे. मध्यम कंपन्यांनी ५,२६९,000 कामगारांना, तर छोट्या उद्योगांनी ६,00५,000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
‘एडीपी रिसर्च इन्स्टिट्यूट’चे सहअध्यक्ष आहू यिल्डिर्माझ यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या संख्येने नोकºया गमावणे ही अभूतपूर्व घटना आहे. महामंदीच्या संपूर्ण काळात जेवढे रोजगार गेले त्याच्या कितीतरी पट अधिक रोजगार यंदा एकट्या एप्रिल महिन्यात गेले आहेत.
विशेष म्हणजे ही आकडेवारी परिपूर्ण नाही. कोविड-१९ मुळे गेलेल्या सर्व नोकऱ्यांचा यात समावेश नाही. ही आकडेवारी केवळ कंपन्यांच्या ‘पेरोल’वर असलेल्या कर्मचाºयांचीच आहे. प्रत्यक्ष आकडा यापेक्षा किती तरी मोठा असणार आहे. दरम्यान, अमेरिकी सरकारकडून जारी होणार असलेला रोजगारविषयक अहवालही भीषण असण्याची शक्यता आहे. सात दशकांपूर्वी मासिक रोजगार स्थिती जारी करण्यास अमेरिकेत सुरुवात झाली होती. एप्रिलमधील रोजगाराची स्थिती या संपूर्ण काळातील सर्वात वाईट असण्याची शक्यता आहे.
मागील सहा आठवड्यांत अमेरिकेतील ३0 दशलक्षापेक्षा जास्त लोकांनी बेरोजगारी लाभासाठी अर्ज केले आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे जगभरात कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकर कपात सुरू केली आहे.
‘आयुष्यात कधीही पाहिली नाही अशी स्थिती’
सेंट्रल रिझर्व्ह बँक आॅफ शिकागोच्या एका अर्थतज्ज्ञाने सांगितले की, एप्रिलमधील वास्तविक बेरोजगारीचा दर २५.१ टक्के ते ३४.६ टक्के यादरम्यान राहण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हचे उपाध्यक्ष रिचर्ड क्लॅरिडा यांनी सांगितले की, बेरोजगारीचा दर १९४0 पेक्षाही वाईट पातळीवर जाऊ शकतो. कोविड-१९ च्या साथीमुळे अर्थव्यवस्था प्रचंड प्रमाणात घसरली आहे. सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. आपण आपल्या आयुष्यात कधीही पाहिलेले नाही, अशा स्वरूपाच्या बेरोजगारीचा आणि आर्थिक घसरणीचा सामना करीत आहोत.