वॉशिंग्टन - कोरोनाचं संकट असतानाच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. निवडणूक उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान ट्रम्प यांनी भारतावर टीका केली आहे. "भारत हा विषारी हवा सोडणारा देश आहे" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी अध्यक्षीय वादविवादात पर्यावरण बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर आपल्या धोरणांचा बचाव करण्यासाठी भारत, चीन आणि रशियावर निशाणा साधला. 'अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करतो. त्या उलट चीन, भारत आणि रशिया आपल्या देशातील हवेच्या स्तराचा विचार करत नाही. या तीन देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे' असं म्हणत हे देश प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदलाबाबत घेतलेल्या भूमिकेवर यापूर्वीही टीका करण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वीदेखील हवा प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर विरोधकांसोबतच भारत, रशिया आणि चीनवर टीका केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन जिंकल्यास त्या निकालाला विद्यमान राष्ट्राध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात आव्हान देण्याचीही शक्यता आहे. कोरोना साथीला फार महत्त्व न देणाऱ्या तसेच विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनाच जेव्हा त्या संसर्गाची बाधा झाली त्यावेळी रिपब्लिकन पक्ष हादरला होता.
US Election : बायडन जिंकल्यास डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात जाण्याची शक्यता
राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या मतदानाचा दिवस अगदी तोंडावर आलेला असताना ट्रम्प यांची प्रचार मोहीम थंडावणे त्या पक्षाला मानवणारे नव्हते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनीही रुग्णालयात काही दिवसच राहून पुन्हा प्रचार मोहिमेत उडी घेतली. ज्यो बायडन यांची जिंकण्याची शक्यता ट्रम्प यांच्यापेक्षा 17 टक्क्यांनी अधिक आहे, असा निष्कर्ष ओपियम रिसर्च व गार्डियनने केलेल्या जनमत चाचणीतून काढण्यात आला होता. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी "मास्क लावणारे लोक नेहमीच कोरोनाग्रस्त असतात" असं वादग्रस्त विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं.
मास्क लावणारे नेहमीच असतात कोरोनाग्रस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचं वादग्रस्त विधान
मियामी या ठिकाणी एनबीसी न्यूजचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ट्रम्प यांनी हा दावा केला होता. 26 सप्टेंबरला व्हाइट हाऊसमध्ये एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात आलेल्या लोकांमुळे ट्रम्प यांना कोरोना झाल्याचं म्हटलं जातं आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी मास्क लावले नव्हते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता नेहमी मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त असतात असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.