Israel-Hamas War: गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास, यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने (IDF) गाझामध्ये हमासचे 800 बोगदे सापडल्याचा दावा केला आहे. रविवारी एक निवेदन जारी करून IDF ने म्हटले की, 'इस्रायलने 27 ऑक्टोबर रोजी गाझामध्ये कारवाई सुरू केल्यापासून हमासचे बोगदे आणि बंकर्सचे भूमिगत नेटवर्क नष्ट झाले आहेत.'
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी गाझामध्ये शेकडो किलोमीटरचे बोगदे तायर केले होते. या बोगद्यांचा वापर शस्त्रे लपवण्यासाठी, हल्ला करण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी केला जायचा. हे भूमिगत नेटवर्क आकाराने न्यूयॉर्कच्या सबवे नेटवर्कप्रमाणेच असल्याचे अनेकांचे म्हणने आहे.
इस्रायली सैन्याने सांगितल्यानुसार, संपूर्ण गाझा पट्टीत या बोगद्यांचे जाळे पसरले आहे. बहुतांश बोगद्यांचे एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट नागरी वस्ती, शाळा, रुग्णालये, मशिदींजवळ आहे. हे नेटवर्क सापडल्यानंतर इस्रायली सैन्याने बहुतांश बोगदे बॉम्बने उडवले आहेत. यामुळे हमासचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वीच इस्रायलने या बोगद्यांचा व्हिडिओही जारी केला होता.