हनोई - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान कोरोनाचा प्रसार करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. थेट पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून तुरुंगात रवानगी झाली आहे. व्हिएतनाममध्ये एका व्यक्तीला कोरोना नियमांचं उल्लंघन करणं भारी पडलं आहे.
कोरोनाचा संसर्ग फैलावल्याप्रकरणी ही व्यक्ती दोषी आढळली असून पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. व्हिएतनाममध्ये ही घटना घडली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 28 वर्षीय ली वॅन ट्री या तरुणालाही शिक्षा ठोठावण्यात आली. व्हिएतनाम न्यूज एजन्सीने (VNA) दिलेल्या वृ्त्तानुसार, ट्री याला 21 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र हा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्याने हो चि मिन्ह शहरातून पुन्हा सीए माउ शहरामध्ये दाखल झाला.
आठ जणांना कोरोनाचा संसर्ग, एकाचा मृत्यू
ट्रीमुळे आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यातील एका व्यक्तीचा एका महिन्याच्या उपचारानंतर मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवलेल्या मोजक्या देशांमध्ये व्हिएतनामचा समावेश आहे. व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, विविध निर्बंध लागू केले होते. त्याच्या परिणामी संसर्गावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, एप्रिल महिन्यानंतर व्हिएतनाममध्ये पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढू लागली. डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली होती. त्यानंतर सरकारने पुन्हा एकदा निर्बंध लागू केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भीषण, भयंकर, भयावह! अमेरिकेत 55 सेकंदात एकाचा मृत्यू तर दर 60 सेकंदात तब्बल 111 जणांना कोरोनाची लागण
अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत असून अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंतची सर्वात भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहे. 55 सेकंदात एकाचा मृत्यू तर दर 60 सेकंदात तब्बल 111 जणांना कोरोनाची लागण होत असल्याची माहिती आता समोर आली आहे. अमेरिकेत दर सेकंदाला कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर रुग्णांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 6.62 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णालयात देखील जागा शिल्लक नसल्याचं चित्र आहे.