अभिमानास्पद! दररोज १५०० जणांना मोफत जेवण देणाऱ्या भारतीय व्यक्तीचा ब्रिटनकडून सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 03:50 PM2021-07-08T15:50:38+5:302021-07-08T15:51:56+5:30
डोक्यावर छप्पर नसलेल्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा माणुसकीचा ध्यास हैदराबादच्या ४१ वर्षीय सय्यद उस्मान अझर मकसुसी यांनी हाती घेतला होता.
डोक्यावर छप्पर नसलेल्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा माणुसकीचा ध्यास हैदराबादच्या ४१ वर्षीय सय्यद उस्मान अझर मकसुसी यांनी हाती घेतला होता. सुरुवातीला अतिशय छोट्या स्वरुपात सुरू केलेल्या दानशूरतेच्या या कामाला गेल्या दहा वर्षांत खूप मोठं स्वरुप प्राप्त झालं आहे. सध्या सय्यद अझर दररोज जवळपास १५०० लोकांच्या मोफत जेवणाची व्यवस्था करतात. सय्यद यांच्या याच दानशूरतेची दखल थेट ब्रिटननं घेतली आहे. सय्यद उस्मान अझर मकसुसी यांना ब्रिटनच्या कॉमनवेल्थ पॉईंट ऑफ लाइट पुरस्कार जाहीर झाला आहे. (Man Feeding 1500 People for Free Every Day Gets UK Award)
सय्यद यांनी २०१५ साली सैनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या नावानं एक सामाजिक संस्था सुरू केली होती. 'दो रोटी' कम्पेनच्या माध्यमातून त्यांनी हैदराबादमधील नागरिकांना गरीब आणि आधार नसलेल्या लोकांचं पोट भरण्यासाठी मदत करण्यासाठीचं आवाहन केलं होतं. यासाठी त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन डोक्यावर छप्पर नसलेल्या आणि कोणताही आधार नसलेल्या व्यक्तींना अन्न मिळावं यासाठी अन्न गोळा करण्यास सुरुवात केली होती. याशिवाय, भुकेला कोणताही धर्म नसतो या बोधवाक्यावर चालणाऱ्या सय्यद यांनी कोरोना काळात गरीबांना अन्न उपबल्ध करुन देण्यासाठी खूप मेहनत घेतली. हजारो नागरिकांना फूट पॅकेट्सच्या माध्यमातून अन्नदान सुरू ठेवलं होतं.
"कॉमनवेल्थ पॉइंट्स ऑफ लाइन पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल ब्रिटीश डेप्यूटी हायकमिशनचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. या पुरस्कारामुळे यापुढे आणखी जोमानं काम करण्याची मला प्रेरणा मिळेल", असं मत सय्यद यांनी यावेळी व्यक्त केलं.