बँकॉक : थायलंडमध्ये मंगळवारी पहाटे अनपेक्षित पाऊल उचलत लष्कराने आणीबाणी लागू केली असून, सहा महिन्यांच्या सरकारविरोधी आंदोलनामुळे देशाची विस्कटलेली घडी बसवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे; पण त्याचबरोबर हे बंड नसल्याचेही स्पष्ट कले आहे. लष्करप्रमुख प्रयुथ चान ओ चा यांनी देशातील प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांना वाटाघाटीसाठी बोलावले आहे. आणीबाणी जाहीर केल्यानंतर काही तासांनंतर उचललेले हे पाऊल आहे. आम्ही दोन्ही बाजूंच्या नेत्यांना वाटाघाटीसाठी निमंत्रित करीत आहोत; पण परिस्थिती अजूनही नाजूक आहे. त्यामुळेच मार्शल लॉ लागू केला आहे, असे प्रयुथ यांनी पत्रकारांना सांगितले. लष्कराच्या वाहिनीवर पहाटे ३ वाजता देशात मार्शल लॉ लागू केल्याची घोषणा करण्यात आली. देशात सुरक्षा ठेवणे ही लष्कराची जबाबदारी आहे, त्यामुळे मार्शल लॉ लागू केला असून हे बंड नव्हे, असे म्हटले आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, आपले नेहमीचे व्यवहार चालू ठेवावेत. आणीबाणीचा काळजीवाहू सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही; पण लष्कराला देशात आणीबाणी लागू करण्याचा अधिकार आहे. शांतता प्रस्थापित होईपर्यंत मार्शल लॉ राहील, असे प्रयुथ यांनी सरकारी अधिकार्यांना सांगितले आहे. थायलंडमध्ये दीर्घकाळ चाललेल्या राजकीय तणावानंतर मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. शिनवात्रा यांचे सरकार बडतर्फ करण्यासाठी विरोधक सामूहिक आंदोलन करीत आहेत. (वृत्तसंस्था)
थायलंडमध्ये ‘मार्शल लॉ’
By admin | Published: May 21, 2014 2:05 AM