प्राचीन उभयचर प्राण्याला वाचवण्यासाठी मेक्सिकोतील नन्सचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 03:35 PM2018-06-11T15:35:23+5:302018-06-11T15:35:54+5:30
एकेकाळी मेक्सिकोच्या तळ्यांमध्ये हा प्राणी मोठ्या संख्येने आढळायचा. अक्सोलोतुलचं मेक्सीकोच्या इतिहासातही महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे.
मेक्सिको सिटी- पुराणामध्ये स्थान मिळालेल्या एका प्राण्याला वाचविण्यासाठी मेक्सिकोमधील चर्चच्या नन्स पुढे आल्या आहेत. नष्ट होण्याच्या मार्गावरील उभयचर प्रजातीला वाचविण्यासाठी या नन्स काम करत आहेत.
या उभयचर प्राण्याचं नाव आहे 'अक्सोलोतुल'. ऐकायला-वाचायला थोडंसं अवघड नाव असलं तरी या उभयचर प्राण्याला मेक्सिको देशाच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. एकेकाळी मेक्सिकोच्या तळ्यांमध्ये हा प्राणी मोठ्या संख्येने आढळायचा. अक्सोलोतुलचं मेक्सीकोच्या इतिहासातही महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे. एक प्राचीन आणि पुराणांमध्ये उल्लेख असलेला प्राणी अशी त्याची ओळख आहे.
या प्राण्याचा उपयोग औषधातही केला जातो. या प्राण्यापासून कफ सिरप केले जाते. मेक्सिकोमध्ये या औषधाला भरपूर मागणी आहे. त्याच्या ग्राफिटीही मेक्सिकोमध्ये रस्त्यांवर दिसून येतात. पण त्यामुळेच त्याची मोठ्या प्रमाणात पकड होऊ लागली. औषध तयार करण्यासाठी पकडल्यामुळे आणि वाढत्या जलप्रदुषणामुळे त्यांची संख्या कमी होत गेली. एकवेळ हा प्राणी पूर्ण नष्ट होईल की काय अशी भीतीही निर्माण झाली. पण मेक्सीकोतील एका चर्चमधील नन्स या प्राण्याला वाचविण्यासाठी पुढे आल्या. त्यांनी या प्रजातीच्या काही जीवांची व्यवस्थित काळजी घ्यायला सुरुवात केली. आज त्या घेत असलेल्या काळजीमुळे अक्सोलोतुलची संख्या वाढत आहे. इंग्लंडमधील चेस्टर प्राणीसंग्रहालय तसेच मेक्सिकोतील मिखोकाना विद्यापीठ यांनी या मेक्सिकन नन्सच्या मदतीने या प्राण्याला नष्ट होण्यापासून वाचवलं आहे. याप्रकारचा अत्यंत विशेष असा उपक्रम मेक्सिकन चर्चने हाती घेतल्यामुळे जगभरातून या नन्सवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.