संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) दिलेल्या निर्णयाची मेक्सिकोने प्रशंसा केली आहे. आंतरराष्ट्रीय कैद्यांना वकिलाचा संपर्क देण्याबाबतच्या कायद्याचे गांभीर्य या निर्णयामुळे वाढले आहे. व्हिएन्ना करारान्वये आखण्यात आलेले हे नियम पाळायचे की नाही हे सदस्य देशांच्या लहरीवर ठरू शकत नाही, हेही न्यायालयाने निर्धारित केले आहे, असे मेक्सिकोने म्हटले आहे.
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने देहदंडाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेचा पाकिस्तानने फेरविचार करावा, असा आदेश आयसीजेने दिला आहे. आयसीजेचे अध्यक्ष न्या. अब्दुयुलकावी युसूफ यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा निर्णय दिला असून, कुलभूषण सुधीर जाधव यांच्या शिक्षेचा पाकिस्तानने परिणामकारकरीत्या फेरविचार करावा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.न्या. युसूफ यांनी आपल्या निर्णयाचा अहवाल बुधवारी १९३ सदस्यीय संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत मांडला. त्यावर आपले मत देताना मेक्सिकोच्या परराष्ट्र मंत्रालयाचे कायदेशीर सल्लागार अलेजांद्रो सेलोरिओ यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बहुआयामी व्यवस्थेचे काम औचित्यपूर्ण व्हावे यासाठी राजनैतिक आणि वकिली संपर्कविषयक नियमांचे प्रभावी पालन होणे आवश्यक आहे. २00३ मध्ये अव्हेना प्रकरणात मेक्सिकोच्या ५४ नागरिकांना अमेरिकेत देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. याप्रकरणाचा उल्लेख सेलोरिओ यांनी भाषणात केला. (वृत्तसंस्था)