मोठा दावा! युद्ध झाल्यास समुद्री हल्ल्यात चीन ठरेल सर्वात भारी, नवा अहवाल समोर; भारताचा नंबर कितवा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 05:09 PM2021-03-21T17:09:13+5:302021-03-21T17:10:13+5:30
Strongest Military in world: सीमेवर वारंवार भारताला आव्हान देणारा चीन आता लष्करी सामर्थ्यात सर्वात पुढे निघून गेला आहे.
Strongest Military in world: सीमेवर वारंवार भारताला आव्हान देणारा चीन आता लष्करी सामर्थ्यात सर्वात पुढे निघून गेला आहे. सतत शेजारच्या देशांच्या सीमेवर डोळा ठेवणाऱ्या आणि विनाकारण कुरापती करणाऱ्या चीनला 'मिलिटरी डायरेक्ट'नं (Military Direct) जगातील सर्वात ताकदवान लष्कर म्हणून घोषीत केलं आहे. तर ७४ गुणांसह अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे आणि ६९ गुणांसह रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सैन्य ताकदीच्या बाबतीत रशियाच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. या अहवालात भारत ६९ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, अहवालातील माहितीनुसार सैन्यदलावर कोट्यवधींचा खर्च करणारा अमेरिका चीनपेक्षा मागे आहे. यादीत फ्रान्स देश ५८ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर ४३ गुणांसह ब्रिटन सहाव्या स्थानावर आहे. संरक्षणासाठीचं बजेट, सक्रिय आणि निष्क्रिय सैन्य कर्मचाऱ्यांची संख्या, हवाई, नौदल आणि लष्कर तसेच अण्वस्त्रांची उपलब्धता व किमान वेतन अशा विविध मुद्द्यांचा अभ्यास करून देशांच्या सैन्य ताकदीची यादी तयार करण्यात आली आहे.
चीन जगातील सर्वात ताकदवान सैन्य असलेला देश ठरला आहे. चीनला १०० पैकी ८२ गुण देण्यात आले आहेत.
समुद्रात चीन, तर हवाई मार्गात अमेरिका अव्वल
समुद्रमार्गे कोणतंही युद्ध झालं तर चीन सर्वात ताकदवान ठरेल आणि युद्ध जिंकेल, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तर हवाई दलात अमेरिका सर्वात आघाडीवर आहे. लष्करी युद्धात रशिया सर्वाधिक सक्षम असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
संरक्षण क्षेत्रावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका आघाडीवर आहे. अमेरिकेकडून दरवर्षी किमान ७३२ अब्ज डॉलर इतका सैन्यावर खर्च केले जातात. तर चीनकडून २६१ अब्ज डॉलर इतका खर्च केला जातो. भारत यात तिसऱ्या स्थानावरुन असून भारताकडून संरक्षणावर ७१ अब्ज डॉलर इतका खर्च केला जातो.
अमेरिकेकडे सध्या तब्बल १४,१४१ लढाऊ विमानं ताफ्यात आहेत. तर रशियाकडे ४ हजार ६८२ लढाऊ विमानं आहेत. चीनकडे ३ हजार ५८८ लढाऊ विमानं आहेत. त्यामुळे हवाईदलात अमेरिका सर्वात आघाडीवर आहे. लष्करी सामर्थ्याबाबत बोलायचं झालं तर रशियाकडे सर्वाधिक ५४,८६६ लढाऊ वाहनं आहेत. अमेरिकेकडे ५०,३२६ आणि चीनकडे ४१,६४१ लष्करी वाहनांचा समावेश आहे. नौदलात चीनचा हात कुणीही पकडू शकत नाही अशी परिस्थिती आहे. चीनकडे तब्बल ४०६ लढाऊ जहाजं आहेत. तर रशियाकडे २७८ आणि अमेरिकेकडे २०२ जहाजं तैनात आहेत.